सांगवी-वाघवस्ती रस्त्याचे काम रखडण्याची शक्यता! | पुढारी

सांगवी-वाघवस्ती रस्त्याचे काम रखडण्याची शक्यता!

अनिल तावरे

सांगवी : बारामती तालुक्यातील सांगवी गावात अनेक भागांत विकासाची कामे झाली आहेत. परंतु, सांगवी ते वाघवस्ती रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असल्याने रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम होणे आवश्यक होते. आता राज्यात सत्तांतर झाल्याने या रस्त्याच्या कामासाठी निधी लवकर उपलब्ध होणे कठीण झाले आहे. प्राधान्यक्रम सोडून नको तिकडेच निधीचा वापर झाल्याचा आरोप या भागातील ग्रामस्थांमधून होत आहे. मागील अडीच वर्षांत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ही महत्त्वाची पदे होती. अजित पवारही सांगत होते की प्राधान्यक्रम असलेल्या रस्त्यांचे प्रस्ताव तयार करून पाठवा, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून सांगवी-वाघवस्ती रस्त्याची दुरवस्था झाली असतानादेखील या रस्त्याचा प्रस्ताव कोणी दिला नाही.

वास्तविक पाहता वाघवस्ती रस्त्यावरून किमान एक हजार नागरिकांची ये-जा असते. परंतु, ज्या रस्त्याने दिवसातून कधी तरी एखादे वाहन जाते त्या रस्त्यावर डांबरीकरणाची कामे झाली आहेत. प्राधान्यक्रम सोडून नको त्या ठिकाणी रस्त्यावर डांबरीकरण करण्याचा नेमका हेतू काय, असा सवाल यानिमित्ताने ग्रामस्थांमधून होतो आहे. या रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांना जाताना त्रास होत आहे. नागरिकांना गावात बाजार किंवा इतर खरेदीसाठी ये-जा करताना चिखलातून जाताना कसरत करावी लागते. या रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव पाठविला असल्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, राज्यात सत्तांतर झाल्याने निधी नेमका उपलब्ध होण्याबाबत अडचण येऊ शकते, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

रस्त्यावरील चिखल हटविण्याची गरज
सांगवी ग्रामपंचायतीच्या वतीने वाघवस्ती भागातील नागरिकांसाठी भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे.चारीपासून वाघवस्तीपर्यंत खोदकामाची माती रस्त्यावर आल्याने चिखल होत आहे. तूर्त या रस्त्यावर पसरलेली माती काढण्याची मागणी होत आहे.

Back to top button