पिंपरी : शहरातील विठ्ठल मंदिरात भाविकांच्या रांगा | पुढारी

पिंपरी : शहरातील विठ्ठल मंदिरात भाविकांच्या रांगा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरात रविवारी (दि. 10) भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दिवसभर संततधार पाऊस सुरू असला तरीही भर पावसात भाविक दर्शनासाठी येत होते. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी ही आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते.

हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला गेला आहे. या दिवशी पंढरपूरला विठ्ठलाच्या ओढीने राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो वारकरी पोहचतात. ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते घराजवळील विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतात.
शहरातही आषाढी एकादशीनिमित्त विविध विठ्ठल मंदिरांमध्ये आज भक्तिमय वातावरण पाहण्यास मिळाले.

सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात सकाळी काकडा आरती, अभिषेक आदी कार्यक्रम झाले. घाडगे महाराज यांनी भारुड सादर केले. कीर्तनकार आनंद मोरे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. मंदिरात दर्शनरांगेची स्वतंत्र व्यवस्था केली होती.

पिंपरीतील एच. ए. कॉलनी येथील विठ्ठल मंदिरात सकाळी महापूजा झाली. 3 भजनी मंडळांनी भजन सादर केले. सायंकाळी आरती आणि दिवसभर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. शहरातील विविध भागांतील विठ्ठल मंदिरातही हाच उत्साह पाहण्यास मिळाला.

Back to top button