कालव्यात कार कोसळली, तिघे जण बचावले | पुढारी

कालव्यात कार कोसळली, तिघे जण बचावले

मंचर; पुढारी वृत्तसेवा: भीमाशंकरहून पुण्याकडे जात असताना मंचर (ता. आंबेगाव) येथील उजव्या कालव्यात कार (एमएच 12 एझेड 1635) कोसळली. मंचर पोलिस व मोरडे फुड्स कंपनीतील कर्मचार्‍यांनी तातडीने मदत केल्यामुळे कोथरूड (पुणे) येथील तिघे
जण बचावले. भीमाशंकर येथे दर्शन घेऊन पुण्याकडे जात असताना मंचर नजित अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे उजव्या कालव्यालगतच्या रस्त्यावरून कार कालव्यात कोसळली.

पवन महेश पाठक (वय 41), शोभा महेश पाठक (वय 61, दोघे रा. भागीरथी टॉवर, कोथरूड, पुणे) पुष्पा महावीर दुबे (वय 76, खंडोबा, मध्य प्रदेश) हे गाडीत जात होते. ही दुर्घटना पाहून जवळच असलेल्या चेतन कराळे ,विकास मोरडे, अनिल वाणी, मंचर ठाण्याचे पोलिस हवालदार तानाजी हगवणे, पोलिस जवान योगेश रोडे यांनी पाण्यात उतरून तिघांनाही सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. क्रेनच्या साह्याने रात्री साडेनऊ वाजता कार बाहेर काढण्यात आली आहे. तिघांची प्रकृती उत्तम असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button