बिबट्याच्या हल्ल्यात गाभण गाय ठार; वर्षभरात 19 हल्ले | पुढारी

बिबट्याच्या हल्ल्यात गाभण गाय ठार; वर्षभरात 19 हल्ले

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा: लौकी (ता. आंबेगाव) येथे रामदास गेनभाऊ वाघ या शेतक-याच्या दोन वर्षाच्या गाभण गाईवर रविवारी (दि.10) पहाटे बिबट्याने हल्ला करून ठार केले. बिबट्याने गेल्या 15 दिवसांत चार ठिकाणी, तर वर्षभरात सुमारे 19 हल्ले केले आहेत. दोन दुचाकीस्वारांवरही बिबट्याने यापूर्वी हल्ला केला आहे. मात्र, वनविभाग निष्क्रिय आहे. पाचघरवस्ती, भैरवनाथवाडी, राणूबाई मंदिर परिसर, गावठाण, दरेकरवस्ती आदी वाडी-वस्तीवर बिबट्याने उच्छाद मांडला आहे.

लौकी- मांजरवाडी रस्त्यालगत काळेमळा येथील शेतकरी रामदास गेनभाऊ वाघ यांचा घराला लागून गोठा आहे. रविवारी सकाळी गोठ्यात जाऊन पहिले असता बिबट्याने गाईला ठार केल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. शेतकर्‍याचे सुमारे 35 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी भेट देऊन पाहणी केल्याचे समजते. वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी माजी सरपंच संदेश थोरात व ग्रामस्थांनी केली आहे.

वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात आंदोलन
लौकी परिसरात बिबट्याकडून वारंवार हल्ले होत आहेत. वनविभाग याबाबत अधिकृत माहिती देण्यास नकार देत आहे. भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. कारवाई काय झाली ? किती शेतकर्‍यांना भरपाई दिली? याचा आकडा सांगत नाहीत, त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून आंदोलनाच्या तयारीत आहेत.

Back to top button