अघवे शहर विठ्ठलमय; आषाढी एकादशीनिमित्त मंदिरांत भक्तीचा महापूर

अघवे शहर विठ्ठलमय; आषाढी एकादशीनिमित्त मंदिरांत भक्तीचा महापूर

पुणे / सिंहगड रोड/ धायरी: पुढारी वृत्तसेवा: हरिनामाचा गजर करीत… विठ्ठलाच्या चरणाचे दर्शन घेत… माउली-तुकारामांचे अभंग गात भाविकांनी मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी साजरी करीत विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. प्रतिपंढरपूर समजल्या जाणार्‍या श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांच्या भक्तीचा महापूर उसळला होता. गेल्या दोन वर्षांपासून अनेक बंधनाच्या पार्श्वभूमीवर या वेळी भाविक रात्रीपासूनच विठ्ठल आणि रखूमाई यांच्या दर्शनासाठी रांगेत थांबले होते. या वेळी मंदिरात ऐश्वर्या गोसावी व धनंजय गोसावी यांच्या हस्ते विठुरायाचे पूजा करण्यात आली. दिवसभरात साधारणतः दोन ते अडीच लाख लोकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.

नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात पहाटे पाच वाजता काकड आरतीने सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अभिषेक करून किशोर बाबर आणि अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाले यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. सकाळी सात वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. साधारणतः 50 हजारांहून अधिक भाविकांनी भगवंतांंचे दर्शन घेतले. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये पहाटे पाच वाजता अभिषेकाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. दिवसभरात 50 हजारांहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सायंकाळी 5 वाजता हरिपाठाचा कार्यक्रम पार पडला. आलेल्या भाविकांना खिचडीचे वाटप ही करण्यात आले.

खासदार सुप्रिया सुळे, आमदार माधुरी मिसाळ यांनीही सकाळी विठ्ठलाचे दर्शन घेतले. या विठ्ठल मंदिरामध्ये अभिषेक, महाआरती व्यतिरिक्त इतर धार्मिक विधी न करता त्रयोदशीला काल्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

                                                  – कुमार गोसावी, व्यवस्थापक, विठ्ठलवाडी मंदिर

निवडुंगा विठोबा मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या उत्साहात विठ्ठलाचे दर्शन घेतले. भर पावसातही भाविकांची विठ्ठलावरची भक्ती अनुभवास आली. दोन वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर आषाढीला गर्दी झाली होती.

                                             – आनंद पाध्ये, व्यवस्थापक, निवडुंगा विठोबा मंदिर

भवानी पेठ विठोबा मंदिरामध्ये धार्मिक विधीबरोबरच महाआरती करून आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. आलेल्या भाविकांना खिचडी आणि फराळाचे वाटप ही ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.

                                          – गोरक्षनाथ भिकुले, पालखी विठ्ठल मंदिर, भवानी पेठ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news