पुण्यात बकरी ईद साधेपणाने साजरी; पावसाच्या साक्षीने सामूहिक नमाज अदा | पुढारी

पुण्यात बकरी ईद साधेपणाने साजरी; पावसाच्या साक्षीने सामूहिक नमाज अदा

पुणे : पुढारी वृत्तसेवा: संततधार पावसाच्या साथीने ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण… विविध मशिदींमध्ये बांधवांसह पार पडलेले नमाज… कुर्बानीचा कार्यक्रम आणि शिरखुर्माचा गोडवा चाखत साधेपणाने, मात्र उत्साहात बकरी ईद शहरात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. कोरोनाची स्थिती सुधारल्यामुळे मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली. यानिमित्ताने संस्था-संघटनांच्या वतीने काही सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. मशिदी आणि ईदगाहच्या ठिकाणी सामूहिक नमाज पठण करण्यात आले. याविषयी सिरत कमिटीचे सरचिटणीस रफीउद्दीन शेख म्हणाले, ‘सर्व मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात आले. सकाळी नऊ वाजता ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले.

त्याचबरोबर प्रत्येक मशिदीमध्ये बांधवांनी नमाज पठण केले. सकाळी 11 वाजता सर्वांत शेवट कॅम्प येथील कुरेशी मशिदीमध्ये नमाज पठण झाले. त्यानंतर प्रत्येकाच्या घरी खीर-शिरखुर्मा आणि बिर्याणी तयार करून ईद साजरी करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देऊ नये, या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, कोंढव्यासह इतर ठिकाणी कचर्‍याच्या गाड्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती. कमिटीचे अध्यक्ष मौलाना गुलाम अहमद कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अहमद सय्यद म्हणाले, ‘नमाज पठणानंतर कुर्बानीचा कार्यक्रम करण्यात आला. या कुर्बानीमध्ये तीन हिस्से करून एक स्वतःला, एक नातेवाइकांना, तर एक गोरगरिबांना वाटण्यात आला. त्यानंतर शिरखुर्मा आणि खिरीचे सेवन करून ईद साजरी करण्यात आली. ’

Back to top button