भोसरी : शाळेची वाट पाण्यातून, शाळेसमोर साचले पाण्याचे तळे | पुढारी

भोसरी : शाळेची वाट पाण्यातून, शाळेसमोर साचले पाण्याचे तळे

भोसरी : पुढारी वृत्तसेवा : मागील चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सावित्रीबाई फुले शाळेसमोर पाण्याचे तळे साचल्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. भोसरी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

त्यामुळे अनेक वर्दळीच्या ठिकाणी पाण्याचे तळे साचले आहे. साचलेल्या पावसाच्या पाण्यातून ये-जा करताना परिसरातील नागरिक, चाकरमानी, दुचाकी, चारचाकी वाहनांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांना पायी चालणेही अवघड झाले आहे.

पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्याने महापालिकेच्या भोंगळ कारभारावर परिसरातील नागरिकांनी नाराजगी व्यक्त केली आहे. तसेच, लवकरात लवकर ही समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. परिसरात जागोजागी पाणी जमा झाल्याचा फटका महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच पालक तसेच शिक्षकांनादेखील सोसावा लागत आहे.

भोसरीतील सावित्रीबाई फुले शाळेसमोर पाण्याचे डबके तयार झाले आहे. ..तसेच, पाणी शाळेचा आवारात घुसले आहे. त्यामुळे या पाण्यातूनच विद्यार्थ्यांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. जवळून मोठे वाहन गेल्यास मुलांच्या अंगावर घाण पाणी उडत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या समस्यांचे निराकरण करावे आणि शाळकरी मुलांची यातून सुटका करावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.

Back to top button