लोखंडी कॉलम चोरणार्‍या आरोपीला अटक; मोठी साखळी असण्याची शक्यता | पुढारी

लोखंडी कॉलम चोरणार्‍या आरोपीला अटक; मोठी साखळी असण्याची शक्यता

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा: किकवी दूरक्षेत्राच्या हद्दीतील बांधकाम साइटवरून लोखंडी सळईचे कॉलम चोरट्यांनी चोरून नेले होते. यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, मुख्य खरेदीदार भंगार व्यावसायिकाला क्लीन चीट दिली आहे. दरम्यान, अशा घटनांमागे मोठी साखळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमधून अनेक गुन्ह्यांचा सुगावा लागण्याची शक्यता आहे.
नीलेश दत्तात्रय गावडे. रा. शिरवळ, वेताळ चौक (ता. खंडाळा) असे लोखंडी सळई, कॉलम चोरी करणार्‍या आरोपीचे नाव आहे. ही घटना किकवी गावचे हद्दीत विलास येवले यांचे नवीन घराचे बांधकामासमोर दि. 3 ते दि. 4 रोजी मध्यरात्रीदरम्यान घडली होती.

बांधकाम व्यावसायिक महेश बाठे यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्याने तिसर्‍या मजल्यावरून 34 हजार किंमतीची 500 किलो लोखंडी सळई चोरून नेल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आतापर्यंत जवळपास अडीच टन लोखंड चोरीला गेल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.
फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी शिरवळ येथून दि. 2 रोजी लोखंड साहित्य खरेदी केले. किकवी येथील विलास येवले यांच्या नवीन घराच्या बांधकामासमोर लोखंडी कॉलम तयार करण्यासाठी ते आणून ठेवले होते. दोन दिवसांनी फिर्यादी साईटची पाहणीसाठी गेले असता त्यांना लोखंडी सळई कॉलम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी स्वतः शोध घेतला असता त्यांना शिरवळ येथील एका भंगार दुकानात लोखंडी साहित्य मिळून आले.

‘त्या’ दुकानदाराला सहआरोपी करण्याची गरज
लोखंडी सळईचे तयार कॉलम भंगार दुकानदाराने खरेदी केले आहेत. तिसर्‍या मजल्यावरून लोखंडी साहित्य चोरताना अनेक जण असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी त्या भंगार दुकानदारालाही सहआरोपी करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

Back to top button