बारामती नगरपरिषदेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढणार : पवार | पुढारी

बारामती नगरपरिषदेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढणार : पवार

बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामती नगरपरिषदेची निवडणूक राष्ट्रवादी काॅंग्रेस विकासाच्या मुद्द्यावर लढवणार असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. विरोधकांच्या कोणत्याही टिकेला खालच्या पातळीवर जाऊन टिप्पणी करू नका, असा सल्ला त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. बारामतीत राष्ट्रवादी भवनामध्ये बारामती नगरपालिका, माळेगाव नगरपंचायत तसेच खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. संभाजी होळकर, इम्तियाज शिकीलकर, सचिन सातव, किरण गुजर, बाळासाहेब तावरे, पुरुषोत्तम जगताप, संदीप जगताप यांच्यासह अनेक नेते याप्रसंगी उपस्थित होते.

पालिकेत संधी देताना नव्या-जुन्यांचा मेळ घातला जाईल. गेल्या पाच वर्षात शहराचा सर्वांगीण विकास केला आहे. 1967 पासून पवार कुटुंबिय काम करत आहे. परंतु गेल्या पाच वर्षात अधिकचा विकास झाला. त्यात कोणताही दुजाभाव केलेला नाही. त्यामुळे विरोधकांनी काहीही आश्वासने दिली तरी शहराचा विकास कोण करू शकते, हे नागरिकांना माहित आहे. निवडणूकीत इच्छुकांची संख्या अधिक असेल. जागा मर्यादित असल्याने सर्वानाच संधी देता येणार नाही. सक्षम व्यक्तींना स्विकृतपदी संधी दिली जाईल. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, निवडणूक सुरू झाल्यानंतर अनेक जण काही ठिकाणी बसून लूज स्टेटमेंट करतात. अशा पद्धतीचे उद्योग कुणीही करू नयेत. बारामतीत घडणाऱ्या गोष्टी माझ्यापर्यंत येत असतात. त्याच्यामुळे सर्वांनीच याबाबत काळजी घ्यावी. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व जागा निवडून आल्या पाहिजेत, एकाही जागेवर पराभव होता कामा नये, अशी सूचना पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केली.

ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांनीही या कामी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. बारामतीत सर्व संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. पालिकेत मागील निवडणूकीत काही जागा गेल्या होत्या. यंदा तसे घडणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. निवडणूकीत विरोधक येतील, टीका करतील निघून जातील. पण शहराचा विकास राष्ट्रवादीच करू शकते, हे मतदारांना पटवून द्या असे आवाहन पवार यांनी केले.

तिकिटासाठी कोणाच्या नादाला लागू नका

राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी तिकिटासाठी कोणाकडेही जाण्याची गरज नाही. इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज करावेत. पात्रतेनुसार उमेदवारी दिली जाईल. तुम्हाला अन्य कुणीही उमेदवारी मिळवून देऊ शकणार नाही. एखाद्याला संधी मिळाली नाही तर त्याला अन्य ठिकाणी सामावून घेतले जाईल. आम्ही संधी दिली नाही की लागलीच विरोधकांना मदतीचे प्रकार करू नका, असेही पवार म्हणाले.

माळेगावची निवडणूक घड्याळाच्या चिन्हावर

माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक घड्याळाच्या चिन्हावरच लढवली जाणार आहे. ग्रामपंचायत असताना माळेगावची निवडणूक नको रे बाबा म्हणण्याची वेळ येत होती. माळेगावच्या सर्वांगीण विकासाकडे राष्ट्रवादीने जाणिवपूर्वक लक्ष दिले आहे. त्यामुळे तेथेही सक्षम असणाऱ्याला उमेदवारी दिली जाईल. ग्रामपंचायतीत केलेले कामही विचारात घेतले जाणार असल्याचे पवार म्हणाले.

आरक्षणानंतर निवडणूक व्हायला हवी होती

राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. समाजातील सर्व घटकांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे अशी सर्वांचीच भावना आहे. ओबीसी आरक्षणासंबधी १५ तारखेला न्यायालयात सुनावणी आहे. हा प्रश्न सुटल्यावर निवडणूका होणे अपेक्षित होते. परंतु आयोगाने कार्यक्रम निश्चित केला आहे. याबाबत काहीजण न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. पण निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर न्यायालय कितपत हस्तक्षेप करेल याबाबत शंका असल्याचेही पवार म्हणाले.

Back to top button