लोकवस्तीकडे वाढतोय बिबट्याचा वावर ! | पुढारी

लोकवस्तीकडे वाढतोय बिबट्याचा वावर !

रांजणगाव गणपती : पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील अनेक भागांत बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यात ऊसतोडणी झाल्यामुळे बिबट्याला आश्रयासाठी जागा उरली नसल्याने बिबट्याने त्याचा मोर्चा लोकवस्तीकडे वळविला आहे. शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, वासरांवर सातत्याने बिबट्या हल्ला करीत आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर यांनी शिरूर तालुका वन अधिकारी मनोहर म्हसेकर यांची भेट घेऊन केली आहे. खंडाळे, सोनेसांगवी, रांजणगाव गणपती, पिंपरी दुमाला, वाघाळे या भागांत सातत्याने पाळीव प्राण्यांवर बिबट्या हल्ला करतो. त्यामुळे स्थानिक नागरिक भयभीत अवस्थेत आहेत.

रात्रीच्या वेळी शेतकर्‍यांना पिकांना पाणी द्यायला घराबाहेर पडायला भीती वाटते. कामगारांना रात्री उशिरा घरी जाताना रस्त्यावर बिबट्याचे दर्शन होते. अनेकदा पिंजरे लावूनही बिबट्या पिंजर्‍याला हुलकावणी देत आहे. त्यामुळे या बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, त्याचबरोबर गावागावांतील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना बिबट्यापासून बचावासाठी प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी वन अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्याकडे शेखर पाचुंदकर यांनी केली. दरम्यान, म्हसेकर यांनी अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत, यावर सातत्याने काम सुरू आहे. तरीदेखील गावागावांत आपण शेतकरी आणि नागरिकांना लवकरच प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

Back to top button