विषाणू, जलजन्य आजारांपासून राहा सावध; आरोग्य विभागाकडून आवाहन | पुढारी

विषाणू, जलजन्य आजारांपासून राहा सावध; आरोग्य विभागाकडून आवाहन

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांचा धोका लक्षात घेता राज्य शासनाच्या आरोग्य विभागातर्फे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. विषाणूजन्य आणि जलजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने शहरात जोर धरला आहे.

शिळे आणि उघड्यावरील अन्न खाऊ नका, घरात आणि घराभोवती माशा होऊ नयेत, यासाठी स्वच्छता ठेवा, साथीच्या काळात पिण्याचे पाणी उकळून गार करून प्या, आपल्या परिसरातील पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण नियमित होते आहे ना, याबाबत खातरजमा करा. ज्या ठिकाणी स्वच्छता पाळली जात नाही, अशा हॉटेल किंवा इतर ठिकाणी खाणे, पाणी पिणे टाळा. बाहेरील बर्फ खाणे टाळा, घराबाहेर पडताना प्रवासात आपल्यासोबत पाणी ठेवा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

घरात काय कराल?
कोणताही ताप अंगावर काढू नका. ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या.
झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.
तापात स्वतःच्या मनाने किंवा परस्पर औषध दुकानदाराकडून औषध घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा.
घरात साठवलेले घरगुती वापरासाठीचे पाणी व्यवस्थित झाकून ठेवा, म्हणजे त्यात डास अंडी घालू शकणार नाहीत.

Back to top button