पुणे : पुढारी वृत्तसेवा: कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयासमोरील रस्त्यावरचे पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले खड्डे व्यवस्थित न बुजवल्याने पुणेकर वाहनचालकांना प्रचंड त्रास होत आहे. या खड्ड्यांमुळे या परिसरात वाहतूक कोंडी होत असून, येथून जाणार्या नियमित वाहनचालकांना मणक्याच्या समस्या येत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून एस. एम. जोशी हिंदी माध्यमिक विद्यालयासमोरील रस्त्यापासून कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय चौक आणि त्यापुढे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रवेशद्वारापर्यंत पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम केले होते. मात्र, हे खोदकाम व्यवस्थितरीत्या बुजविण्यात आलेले नाही. त्यामुळे येथील रस्त्यावर हडपसरच्या दिशेने येणार्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. तसेच खड्ड्यांमधून मार्ग काढताना नाकी नऊ येत आहेत. परिणामी येथे अपघात होण्याची शक्यता आहे.
चिखलामुळे नागरिकांचे कपडे होतात खराब
या रस्त्यावर खड्ड्यांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांचे कपडे खराब होत आहेत. एखादी गाडी येथील खड्ड्यातून गेली तर शेजारी असलेल्या वाहनचालक, पादचार्यांच्या अंगावर चिखल उडत आहे. त्यामुळे या रस्त्याचे खोदकाम करून खड्डे व्यवस्थितरीत्या न बुजविणार्या सुस्त अधिकार्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी आणि खड्डे व्यवस्थित बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
मी दररोज मांजरी येथून मार्केट यार्ड येथे कामासाठी येत असतो. गेल्या पंधरा दिवसांपासून या खड्ड्यांचा त्रास मला सहन करावा लागत आहे. येथील खड्ड्यांमुळे पाठ आणि मान दुखू लागली आहे. तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून नाहक त्रास होत आहे.
–नीलेश इंगळे, वाहनचालक