‘ते’ शिक्षक राहणार पालिकेच्याच सेवेत; अतिरिक्त आयुक्तांचे स्पष्टीकरण | पुढारी

‘ते’ शिक्षक राहणार पालिकेच्याच सेवेत; अतिरिक्त आयुक्तांचे स्पष्टीकरण

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ‘महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील शाळांमध्ये जोपर्यंत महापालिकेकडून नवीन शिक्षकभरती केली जात नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेचे शिक्षक महापालिकेच्याच सेवेत राहतील,’ अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांनी दिली. महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 11 आणि 23 अशा 34 गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या 64 शाळा आहेत. या शाळांमध्ये जिल्हा परिषदेचे 350 शिक्षक सध्या कार्यरत आहेत. गावांच्या समावेशामुळे गावांमधील शाळाही महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या ताब्यात आल्या आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी या शाळांसाठी शिक्षकांची व्यवस्था महापालिकेने करावी, असे सूचित केले होते. तसेच, शिक्षकांची बदली प्रक्रियाही सुरू केली होती. मात्र, ‘पवित्र’ पोर्टलवर शिक्षक उपलब्ध नसल्याने आणि ‘टीईटी’ घोटाळ्यामुळे शिक्षकभरती रखडली आहे. त्यामुळे नवीन शिक्षकभरती होईपर्यंत जिल्हा परिषदेचे हे शिक्षक महापालिकेच्याच सेवेत राहावेत, असे पत्र महापालिकेने जिल्हा परिषदेला दिले होते. त्याला जिल्हा परिषदेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जिल्हा परिषदेने असा निर्णय घेतल्याने नवीन शिक्षकभरती होईपर्यंत जिल्हा परिषदेचे शिक्षक महापालिकेच्या सेवेत राहणार असून, त्यांचे वेतनही महापालिकाच देणार असल्याचे कानडे यांनी सांगितले. शिक्षकभरतीसाठी जाहिरात देण्याची प्रक्रियाही आम्ही सुरू केल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

Back to top button