बोगस फेरीवाल्यांचा सुळसुळाट; रेल्वे प्रवाशांची होतेय लूट

बोगस फेरीवाल्यांचा सुळसुळाट; रेल्वे प्रवाशांची होतेय लूट

प्रसाद जगताप

पुणे : रेल्वे प्रवासादरम्यान या ना त्या वस्तू आणून विकणार्‍या आणि जेवण, चहा आणून देणार्‍या बोगस फेरीवाल्यांचा सुळसुळाट झाला आहे. हे फेरीवाले प्रवाशांना अवाच्या सवा दरात वस्तूंची विक्री करून लुटत आहेत. मात्र, याकडे रेल्वे प्रशासन, आरपीएफचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वे प्रवासादरम्यान विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी अनेक फेरीवाले रेल्वे गाड्यांतून फिरतात. यातील काही फेरीवाल्यांना रेल्वे प्रशासनाने अधिकृत परवानगी दिली आहे, तर काही फेरीवाले अनधिकृतरित्या वस्तूंची विक्री करतात. यात अनधिकृत फेरीवाल्यांकडून प्रवाशांची लूट होत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु रेल्वे प्रशासन आणि आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा बल) याकडे दुर्लक्ष होत आहे.

पुण्याहून नांदेडला जाणार्‍या प्रवाशासोबत अशीच एक घटना नुकतीच घडली. 'आयआरसीटी'चे ओळखपत्र परिधान करून आलेल्या एका फेरीवाल्याने जेवण आणून देतो, असे सांगून प्रवाशाकडून पैसे घेतले आणि पसार झाला. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून अद्यापपर्यंत या घटनेची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही.

रेल्वेच्या पुणे विभागात 18 स्थानकांवर सीसीटीव्ही
पुणे : रेल्वे स्थानकांवर काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता रेल्वे मंत्रालयाकडून निर्भया फंडअंतर्गत सीसीटीव्ही बसविण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार पुणे विभागातील 18 रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
या स्थानकांचा समावेश
1) आकुर्डी 2) बेगडेवाडी 3) चिंचवड 4) दापोडी 5) देहूरोड 6) घोरावडी 7) कामशेत 8) कराड 9) कासारवाडी 10) खडकी 11) कोल्हापूर 12) मळवली 13) पिंपरी 14) सांगली 15) सातारा 16) शिवाजीनगर 17) तळेगाव
18) वडगाव

पुणे रेल्वे स्थानकावरील कारवाई
(जाने. ते जून 2022 कालावधी)
अनधिकृत फेरीवाले कारवाई – 1 हजार 73
दंड रक्कम – 7 लाख 4 हजार 350

असे ओळखा अधिकृत फेरीवाले
रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांनी अधिकृत फेरीवाल्यांकडूनच आवश्यक त्या वस्तूंची खरेदी करावी. फेरीवाल्याचे ओळखपत्र पाहावे, तसेच वस्तू हातात आल्यानंतरच फेरीवाल्याला पैसे द्यावेत. पाकिटावरील मूळ किमतीपेक्षा अधिक पैसे देऊ नयेत.

रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृतरीत्या फिरणार्‍या फेरीवाल्यांवर आरपीएफकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत हजारो फेरीवाल्यांवर कारवाई केली असून, पुणे रेल्वे स्थानक अनधिकृत फेरीवाल्यांपासून मुक्तीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

                                                   बी. एस. रघुवंशी, इन्स्पेक्टर, आरपीएफ

logo
Pudhari News
pudhari.news