आंबेगावातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत | पुढारी

आंबेगावातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

मंचर : पुढारी वृत्तसेवा: पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला, तरीही आंबेगाव तालुक्यात जोरदार पाऊस न झाल्याने विहिरींची पाणीपातळी अजूनही खालावलेली आहे. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहावयास मिळत आहेत. सध्या मुंबई, कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमीच आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस कमी असल्याने सध्या शेती पिकांना पाण्याची गरज भासत आहे. शेतकरी पाणी देत असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यातच वळवाचा पाऊस यावर्षी झाला नाही, त्यामुळे जमिनीतील पाणीपातळी कमीच राहिली आहे.

सध्या थोडाफार पाऊस पडला असला तरी त्या पावसाचा जास्त फायदा पिकांना तसेच जमिनीतील पाणीपातळी वाढण्यासाठी झालेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला, तर जमिनीतील पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. सध्या पाऊस कमी असल्याचा फटका पिकांना बसत आहे. अत्यल्प पाऊस झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडला होता. परंतु, यंदा जुलैचा पहिला आठवडा संपला तरी अजूनही जोरदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या घोडनदीतील पाणी व उजवा कालव्यात सोडलेले पाणी यावर शेतकरी शेतातील पिके जगवत आहेत.

Back to top button