

पुणे : पुढारी वृत्तसेवा: 'मी तीस महिने वाहिन्यांवर दाभोलकर हत्येच्या बातम्या पाहत होतो. पण, पोलिसांशी कोणताही पत्रव्यवहार केला नाही,' अशी माहिती उलटतपासणीदरम्यान संजय साडविलकर यांनी न्यायालयाला दिली. कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतरच्या तासाभरातच मी कोल्हापूरचे डीवायएसपी आणि राजापुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना समक्ष भेटलो. मात्र, त्यांनी माझा जबाब नोंदविला नाही, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. साक्षीनंतर साडविलकर यांची उलटतपासणी शुक्रवारी झाली. बचाव पक्षातर्फे प्रकाश साळसिंगीकर यांनी त्यांची उलट तपासणी घेतली.
'मी शिवप्रतिष्ठानचा कार्यकर्ता होतो,' असे साडविलकर यांनी सांगताच त्याचा काही पुरावा आहे का? असे विचारल्यानंतर वृत्तपत्रात नाव आले होते. पण पुरावा आणू शकत नसल्याचे साडविलकर यांनी सांगितले. शिवप्रतिष्ठानच्या दुगार्माता दौडच्या कार्यक्रमात मीच वीरेंद्र तावडे यांना बोलावले होते, असेही साडविलकर म्हणाले. डॉ. दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर आपण पोलिस अधिकारी विजय पाटील यांना कळवले. पण पोलिस स्टेशनमध्ये जाऊन माहिती दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी (दि. 11) पुन्हा संजय साडविलकर यांचीच उलटतपासणी होणार आहे.
'मी पिस्तुलाचा धंदा करीत नव्हतो'
'2006 पासून तावडे याच्या संपर्कात होतो. यादरम्यान त्याने आपल्याकडे पिस्तूल व गोळ्या तयार करून देण्याची मागणी केली होती, असे संजय साडविलकर यांनी साक्षीदरम्यान सांगितले होते. परंतु, मी पिस्तुलाचा धंदा करीत नव्हतो,' असे साडविलकर यांनी उलटतपासणीदरम्यान सांगितले.