पेट्रोल पंपांवर ना हवा, ना पाणी; स्वच्छतागृहांत जायचीही नाही सोय | पुढारी

पेट्रोल पंपांवर ना हवा, ना पाणी; स्वच्छतागृहांत जायचीही नाही सोय

टीम पुढारी

पुणे :‘गाडी कितीही महाग असो, तिच्या चाकात हवा नसेल, तर ती पंक्चर होणारच; पण आम्हा ग्राहकांना पंपावर त्याच्यासाठी असलेल्या कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. हवा नाही, प्यायला पाणी नाही, स्वच्छतागृहात जायची तर सोयच नाही…’ या प्रतिक्रिया आहेत शहरातील सामान्य वाहनधारकांच्या. वाहनधारकांना दिवसाला लाखो रुपयांचे इंधन विकणार्‍या पंपांवर ग्राहकराजाला नियमानुसार सुविधाच मिळत नाहीत, असेच चित्र बहुतांश पंपांवर दै. ‘पुढारी’च्या पाहणीत दिसले.

‘टीम पुढारी’ने सलग चार दिवस शहराच्या विविध भागांत जाऊन पेट्रोल पंपांवर ग्राहकांसाठीच्या सुविधांची पाहणी केली असता बहुतांश ठिकाणी निराशाच झाली. अनेक पंपांवर गाडीच्या चाकात हवा भरण्याची सोय नव्हती, काही ठिकाणी असली, तरी ती सेवा मोफत नव्हती. काही ठिकाणी स्वच्छतागृहेच नाहीत. ज्या ठिकाणी आहेत तेथे महिला व पुरुषांसाठी वेगळी नाहीत. त्यामुळे महिलांना पंपावर कुठेही स्वच्छतागृहात जाता येत नाही.

हडपसर परिसरातील हिंदुस्तान व भारत पेट्रोलियम पंपांवर
पिण्याचे पाणी नाही. स्वच्छतागृह आहे, मात्र ते पुरुष व महिलांसाठी एकत्र आहे. हवाही मोफत नाही. कामगार मिळत नसल्याचे कारण दाखवून त्याचे कंत्राट दिले आहे. त्यामुळे वाहनधारकाला हवेचे पैसे मोजावे लागतात. हडपसर गाडीतळ येथील हिंदुस्तान पेट्रोलियम पंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणार्‍या ग्राहकांच्या सुविधेकडे काणाडोळा करीत असल्याचे दिसून आले. सिद्धेश्वर पेट्रोल पंपावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली, तरी ती केवळ तेथील कर्मचार्‍यांसाठीच असून, सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नाही. पुरुष आणि महिलांसाठी एकच स्वच्छतागृह असून, त्याची अवस्था वाईट आहे. कामगार मिळत नसल्याने हवा भरण्याचे मशिन बंद असल्याचे कर्मचार्‍याने सांगितले, परंतु त्याच ठिकाणी खासगी ठेकेदाराला हवा भरण्याची मुभा देण्यात आली आहे. दुचाकीस्वाराला 10 रुपये, चारचाकीस्वाराला 20 रुपये, तर मालवाहतूकदाराला 40 ते 50 रुपये दर आकारले जात असल्याचे पाहणीतून निदर्शनास आले.

फर्ग्युसन रस्ता
महिलांसाठी स्वच्छतागृहांची वेगळी व्यवस्था नाही, महिलांसाठी पिण्याचे पाणी नाही अन् वाहनांत हवा भरण्यासाठीची सुविधा नाही. हे चित्र आहे फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपांवरचे. येथे असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपावर महिला-पुरुषांसाठी स्वच्छतागृह नाही. पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा नाही. वाहनांत हवा भरण्यासाठीची सुविधाही नसल्याचे दिसले. येथे दै. ‘पुढारी’च्या महिला प्रतिनिधीने स्वच्छतागृहाची चौकशी केल्यावर कर्मचार्‍याने येथे स्वच्छतागृह नसल्याचे सांगितले.

महिला व पुरुषांचे स्वच्छतागृह एकत्रच
दुसर्‍या बाजूला या रस्त्यावर असलेल्या भारत पेट्रोलियमच्या पंपावर हवा भरण्याची सुविधा आहे, तर पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि स्वच्छतागृहही आहे, पण महिला-पुरुषांना वापरण्यासाठी एकच स्वच्छतागृह आहे. महिलांसाठी वेगळे स्वच्छतागृह येथे नाही. त्यामुळे या रस्त्यावर महिला वाहनचालकांसाठी स्वच्छतागृहाची योग्य सुविधा नसल्याचे आढळले.

हे आहेत शासनाचे नियम

गुणवत्तेची चाचणी : इंधनाच्या गुणवत्तेवर संशय
असल्यास पेट्रोलपंपावर पेट्रोल किंवा डिझेलसाठी फिल्टर पेपर टेस्टसाठी ग्राहक आग्रह धरू शकतात. विशेष म्हणजे हे कोणत्याही शुल्काशिवाय केले जाते.

प्राथमिक उपचार किट : रस्ते दुर्घटना कुठेही होऊ
शकते. शहरात किंवा महामार्गावर. जर तुमच्या समोर दुर्घटना झाल्यास तुम्ही प्राथमिक उपचारासाठी पीडित व्यक्तीवर पेट्रोलपंपांना त्यांच्याकडे पूर्ण प्राथमिक उपचार किट ठेवणे आवश्यक आहे.

शौचालय : पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल
भरण्यासाठी येणारे वाहनचालक आणि त्यासोबत असणार्‍या प्रवाशांसाठी स्वच्छ शौचालये असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे ही सुविधा मोफत असते.

पिण्याचे स्वच्छ पाणी : पेट्रोल पंपावर पिण्याचे स्वच्छ पाणी आवश्यक आहे. तसेच बाटलीत पाणी भरू शकतात.
फ— ी हवा : जर तुम्हाला पेट्रोल पंपावर आपल्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत. प्रत्येक पेट्रोलपंपावर तुम्हाला टायरमध्ये हवा भरण्यासाठी एकही पैसा देण्याची गरज नाही. ही सेवा मोफत असते.

महिलांसाठी पंपावर सुविधा हवी
वैद्यकीय सेवा देण्यासाठी रोज पुणे शहरात येत असते. सोलापूर महामार्गावर असणार्‍या अनेक पेट्रोल पंपांवर महिलांसाठी लागणार्‍या सर्वसामान्य सोयी-सुविधाही उपलब्ध नसतात. हवा भरण्यासाठीही अनेक पेट्रोल पंपावर पैसे मोजावे लागतात. त्यामुळे प्रत्येक पंपचालकाने मोफत हवा भरणे, पिण्याचे पाणी आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

                                                          – डॉ. ऋतुजा निवृत्ती झेंडे (कवडीपाट)

निदान हवा तरी मोफत असावी…
हडपसर परिसरात अनेक पेट्रोल पंपांवर मोफत हवा भरण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे पेट्रोलचे पैसे देऊनही अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. त्यातच घरातील महिला सोबत असल्यानंतर अत्यावश्यक सेवा म्हणून स्वच्छतागृह असणे गरजेचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने अनेक पेट्रोल पंपांवर प्राथमिक उपचारपेटीही नसल्याचे दिसून आले आहे. शासनाने या सर्व बाबींचा विचार करणे गरजेचे आहे.

                                                 – रिंकेश रवींद्र बनसोडे (व्यावसायिक, हडपसर)

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने ठरवून दिलेल्या
निकषांची प्रत्येक तीन महिन्यांनी पडताळणी पेट्रोल पंपांवर जाऊन केली जाते. त्यात ग्राहकांना दिल्या जाणार्‍या सुविधा पाहिल्या जातात. त्यात काही सुविधा नसल्याचे आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाते. प्रत्येक पेट्रोल पंपचालकांना शासनाच्या नियमांचे पालन करावेच लागते.

                           – गौरव आगरवाल, नोडल अधिकारी, हिंदुस्तान पेट्रोलियम, पुणे

(सुनील जगताप, सुवर्णा चव्हाण, शंकर कवडे, समीर सय्यद)

Back to top button