‘खडकवासला’त 19.58 टक्के साठा धरण साखळीत संततधार | पुढारी

‘खडकवासला’त 19.58 टक्के साठा धरण साखळीत संततधार

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा: पावसाचा जोर शुक्रवारी ओसरला असला तरी पानशेत – वरसगाव धरण खोर्‍यातील संततधार पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांत पाण्याची आवक सुरू आहे. शुक्रवारी (दि. 8) सायंकाळी पाच वाजता धरण साखळीत 5.71 टीएमसी म्हणजे 19.58 टक्के पाणीसाठा झाला होता. गुरुवारी सकाळी सहा ते शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर येथे 106 मिलिमीटर पाऊस पडला. याच कालावधीत पानशेत येथे 80, वरसगाव येथे 72 तर खडकवासला येथे केवळ 15 मिलिमीटर पाऊस पडला. पानशेत, मुठा, वरसगाव भागात पावसाचे प्रमाण अधिक आहे.

पानशेत, वरसगाव, टेमघरच्या पाणलोटातील तव, शिरकोलीे, दासवे, दापसरे आदी डोंगरी पट्ट्यात मुसळधार पावसामुळे ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. धरणात पाण्याची आवक वाढली आहे. टेमघर धरणात 7.86, वरसगावमध्ये 17.56 तर पानशेतमध्ये 22.25 टक्के पाणीसाठा झाला आहे. चार धरणात एकूण 5.71 टीएमसी साठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 8 जुलै 2021 रोजी चार धरणांच्या साखळीत 8.86 टीएमसी म्हणजे 29.76 टक्के पाणीसाठा होता. दरम्यान, रायगड जिल्ह्यालगतच्या डोंगरी पट्ट्यात पावसाचा जोर कायम आहे. आठवडाभरात जोर कायम राहिल्यास धरण साखळीत पन्नास टक्के साठा होण्याची शक्यता आहे.

Back to top button