जिल्हा उद्योग केंद्रात नोकरीला असल्याचे सांगत केली फसवणूक; बारामती शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा | पुढारी

जिल्हा उद्योग केंद्रात नोकरीला असल्याचे सांगत केली फसवणूक; बारामती शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा

बारामती, पुढारी वृत्तसेवा: जिल्हा उद्योग केंद्रात नोकरीला लागलो आहे, तुम्हाला ४० टक्के अनुदानात पाॅलिहाऊस व फॅब्रिकेशन व्यवसायाठी प्रत्येकी २५ लाख रुपये मंजूर करून देतो, असे सांगत त्यापोटी १ लाख ८० हजार रुपये घेत एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण बाळासो जगताप (रा. जळोची, बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार सुधीर जालिंदर काळोखे (रा. लोधवडे, ता. माण, जि. सातारा) आणि शिलवंत आडनावाच्या व्यक्तिविरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नोव्हेंबर २०२१ ते ७ जुलै २०२२ या कालावधीत ही घटना घडली.

फिर्यादी यांची मराठा इंटिलिजन्स सिक्युरिटी सर्व्हीस नावाची एजन्सी आहे. २०१६ मध्ये त्यांच्याकडे सुधीर काळोखे हा कामाला होता. तीन-चार महिने काम केल्यानंतर त्याने काम सोडून दिले. दरम्यानच्या काळात त्यांचा कोणताही संपर्क नव्हता. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये काळोखे याने फिर्यादीची भेट घेतली. त्याने काही नातेवाईकांना फिर्यादीकडे काम मिळवून दिले. यावेळी त्याने मी आता जिल्हा उद्योग केंद्रात पुण्यामध्ये नोकरीला लागलो असल्याचे सांगितले. जिल्हा उद्योग केंद्राचा लोगो असणारे कार्डही त्याने फिर्यादीला दिले. माझ्या वाईट काळात तुम्ही मला मदत केली. मी आता चांगल्या पदावर नोकरीला लागलो आहे, तुम्हाला पाॅलिहाऊस व फॅब्रिकेशन व्यवसायासाठी योजनेतून प्रत्येकी २५ लाख रुपये मिळवून देतो. त्याला ४० टक्के अनुदान आहे. परंतु त्यासाठी लागणारा खर्च साहेबांना देण्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल, असे त्याने सांगितले. फिर्यादीला या दोन्ही प्रकरणांच्या फाईल्स तयार करायला लावल्या. त्यापोटी वेळोवेळी काही रक्कम रोखीत तर काही रक्कम आरटीजीएसद्वारे स्विकारली.

त्यानंतर शिलवंत नावाचे अधिकारी स्थळ पाहणीसाठी येणार असल्याचे सांगितले. एका व्यक्तिला तो घेऊन आला. त्यांनी तुम्ही विश्वासातील आहात, स्थळ पाहणीची गरज नाही, असे म्हणत शिलवंत व स्वतःसाठी प्रत्येकी २० हजार रुपये स्विकारले. त्यानंतर अनेकदा संपर्क करूनही काळोखे यांचा फोन लागला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली.

Back to top button