संततधारेने शेतकरी सुखावला; महामार्गावर पाणी साचल्याने प्रवाशांची तारांबळ | पुढारी

संततधारेने शेतकरी सुखावला; महामार्गावर पाणी साचल्याने प्रवाशांची तारांबळ

चाकण : पुढारी वृत्तसेवा: चाकण पंचक्रोशीत दमदार संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे एकीकडे शेतकरी आनंदात आहेत; तर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर साचलेल्या पाण्याने प्रवासी, पादचारी हैराण झाले आहेत. चाकण- तळेगाव रस्त्यावर खराबवाडी ते चाकणदरम्यान अनेक ठिकाणी काही अंतरात पाणी भरले आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीवर याचा परिणाम होत असल्याच्या वाहनचालकांच्या तक्रारी आहेत. महामार्गावर पाणी साठल्याने येथून होणारी सर्व प्रकारची वाहतूक अत्यंत धीम्या गतीने होत आहे. लगतच्या भागात राहणारे नागरिक, पादचारी, विद्यार्थी, दुचाकीस्वारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

मात्र, या गैरसोयीकडे स्थानिक आणि महामार्ग प्रशासन विभागाने डोळेझाक केली आहे. पुर्वानुभव लक्षात घेता यंदा या भागातील रस्त्यावर साचणार्‍या पाण्याला वाट करून देणे, गटारे व मोर्‍या रुंद करणे आवश्यक होते. मात्र, या संदर्भातील कोणतेही काम केले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा महामार्गावर पाणी भरण्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. चाकण भागात सुरू असलेल्या पावसाने रस्त्यालगतच्या सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचून राहात आहे.

खरीप पिकांची जोमदार वाढ
जून महिन्यात कमी – अधिक पाऊस पडल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने जोर धरला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तालुक्याच्या पश्चिम भागासह अनेक ठिकाणी पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. खेडमधील वाडा, राजगुरूनगर, कुडे, पाईट, चाकण परिसरातील काही भागात तसेच आळंदी, पिंपळगाव, कडूस मंडळातही पावसाच्या चांगल्या सरी कोसळत आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसाने सोयाबीन, ऊस, ज्वारी, बाजरी पिकांना दिलासा मिळाला आहे. सोयाबीन पिके अत्यंत जोमाने वाढत आहेत. लांबलेल्या मान्सूनमुळे यंदा सोयाबीन लागवडीचे क्षेत्र वाढले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

Back to top button