अतिवृष्टीमुळे वरंधा घाटात रस्त्याला भेगा | पुढारी

अतिवृष्टीमुळे वरंधा घाटात रस्त्याला भेगा

भोर : पुढारी वृत्तसेवा: भोर तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात उंबर्डेवाडीजवळ रस्त्याला भेगा पडल्याने रस्ता धोकादायक झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने वरंधा घाट सर्व वाहनांसाठी बंद करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. बुधवारी (दि. 29 जून) वरंधा घाटातील वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळून एक इसम जखमी झाला होता. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षिततेसाठी हा मार्ग अवजड वाहनांसाठी बंद केला होता.

दरम्यान मंगळवारी (दि. 5) उंबर्डेवाडीजवळ रस्त्याला भेेगा पडून रस्ता धोकादायक झाला आहे. तसेच उंबर्डेवाडी ते उंबर्डेदरम्यान दोन ठिकाणी रस्त्याचा कडेचा भाग तुटला आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तुटलेल्या रस्त्याचे काम देखील अर्धवट अवस्थेत आहे. तसेच धबधबे वाहण्यास सुरुवात होऊन त्यातून दगड- माती वाहून येताना दिसत आहे. गटारातही पाणी मावत नसल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे. एकंदरीत हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे.

यामुळे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून हा वरंधा घाट पुढील काही महिने सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. पोलिस यंत्रणेकडून निगुडघर येथे चेकपोस्ट तयार करून फक्त या भागातील स्थानिक नागरिकांनाच त्यांच्या गावात जाण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी सांगितले.

भोर- महाड रस्ता वरंधा घाटात खचल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच धोकादायक ठिकाणी सूचनाफलक, बॅरिकेड्स लावण्यात आली आहेत. नागरिकांनी याची काळजी घ्यावी.

                 – संजय वाघज, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भोर

Back to top button