घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष अपात्रतेबाबत सोमवारी निर्णय | पुढारी

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष अपात्रतेबाबत सोमवारी निर्णय

शिरूर; पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार यांच्या अपात्रतेबाबत उच्च न्यायालयात सोमवारी (दि. 11) फैसला होणार असल्याची माहिती शिवसेनेचे शिरूर तालुकाध्यक्ष सुधीर फराटे यांनी दिली. न्हावरे (ता. शिरूर) येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अ‍ॅड. अशोक रावसाहेब पवार यांनी स्वतः तहयात अध्यक्ष असलेल्या ट्रस्टच्या नावे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची तब्बल 2 कोटी 34 लाख रुपयांची पाच एकर बिगरशेतजमीन 99 वर्षांच्या करारावर केली होती. या निर्णयाच्या विरोधात अपील करण्यात आले होते.

यानंतर प्रादेशिक सहसंचालक (सहकार) यांनी अशोक पवार यांना घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवले होते. त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात सहकारमंत्री यांनी भाडेकरारावर हस्तांतरण होत नसल्याचे कारण देत प्रादेशिक सहसंचालक यांचा निर्णय रद्द केला. सहकारमंर्त्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात संजय बेंद्रे, दादा बेंद्रे, संतोष बाळासाहेब फराटे आणि काकासाहेब खळदकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.

याचिकाकत्र्यांच्या बाजूने अ‍ॅड. विजयसिंह थोरात, अ‍ॅड. सूर्यजीत चव्हाण, अ‍ॅड. सुरेश पलांडे यांनी बाजू मांडली, तर अशोक पवार यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. वाय. एस. जहागीरदार, अ‍ॅड. कानिटकर यांनी काम पाहिले, तर कारखान्याच्या बाजूने अ‍ॅड. विनीत नाईक यांनी काम पाहिले. न्यायालयाने सर्व बाबी तपासून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीस अध्यक्ष अशोक पवार हे पात्र की अपात्र, याचा निकाल राखून ठेवला आहे. यासंदर्भातील निकाल येत्या सोमवारी (दि. 11) न्यायालय जाहीर करणार असल्याची माहिती घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक अ‍ॅड. सुरेश पलांडे यांनी दिली.

Back to top button