वर्धापन दिन जल्लोषात; ‘पुढारी कस्तुरी क्लब’च्या सदस्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन | पुढारी

वर्धापन दिन जल्लोषात; ‘पुढारी कस्तुरी क्लब’च्या सदस्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादरीकरणाने कस्तुरी सदस्यांनी जिंकलेली मने… मनोरंजक खेळांतून आनंद लुटणार्‍या कस्तुरी सदस्या… सदस्यांच्या सादरीकरणाने उलगडलेले आई-मुलीचे अनोखे नाते, मनसोक्त गप्पा अन् गाण्यांचा आनंद घेत कस्तुरी सदस्यांनी जल्लोषात ‘पुढारी कस्तुरी क्लब’चा 15 वा वर्धापन दिन साजरा केला. आपल्या कलागुणांना मुक्त वाट देत सदस्यांनी वर्धापनदिनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले अन् कस्तुरी क्लबद्वारे मिळालेला आत्मविश्वास बोलका केला. ‘पुढारी कस्तुरी क्लब’च्या अध्यक्षा डॉ. स्मितादेवी योगेश जाधव यांनी स्थापन केलेल्या पुढारी कस्तुरी क्लबच्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजिलेल्या विशेष कार्यक्रमात कस्तुरी सदस्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम उत्कृष्टरीत्या सादर केले. ‘पुढारी कस्तुरी क्लब’ आणि ‘मुंबई ऑन्कोकेअर सेंटर पुणे’च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

‘कस्तुरी : स्त्रीची स्मार्ट मैत्रीण’ या ब्रीदवाक्याला साजेसे नियोजन व सादरीकरणाने कार्यक्रम खास बनला. पारंपरिक वेशभूषेत सदस्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली अन् सभागृहात चैतन्य पसरले. उपस्थितांचे स्वागत सुरेल स्वागतगीताने करण्यात आले. त्यानंतर विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. भरतनाट्यम नृत्यशैलीतील गणेश वंदना, ‘संगीत कान्होपात्रा’ या नाटकातील एक भावूक नाट्यप्रवेश रसिकांना खिळवून ठेवणारा ठरला. त्यानंतर नृत्यातून आई आणि मुलगी यांचे नाते उलगडले. मिले सूर मेरा तुम्हारा… या सामूहिक गीत सादरीकरणाने विविधतेतून एकतेचा संदेश देण्यात आला.

यानंतर झालेल्या ‘भारत माता की जय…’ या जयघोषाने सभागृहात राष्ट्रभावनेचे अंकुर स्फुरले. एका चित्रपटातील लावणी गीत आणि त्यावरील नृत्याच्या सादरीकरणाने विशेष लक्ष वेधले. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची लोकप्रिय गाणी सादर करून काही सदस्यांनी मने जिंकली. काही सदस्यांनी रॅम्प वॉक करून आपल्या फॅशनची झलक दाखवली. स्त्रीची व्यावसायिक विविध क्षेत्रे या विषयावरील प्रतिमा असलेला एक केक आणि कस्तुरी क्लबचा सुंदर लोगो असलेला दुसरा केक कापून कस्तुरी क्लबचा 15 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
क्लबच्या सर्व विभागप्रमुख आणि ‘मुंबई ऑन्कोकेअर सेंटर’च्या डॉ. रितू दवे आणि प्रेक्षकांच्या उपस्थितीत केक कापून हा दिवस साजरा करण्यात आला आणि एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. ‘मुंबई ऑन्कोकेअर सेंटर पुणे’च्या वतीने डॉ. दवे यांनी स्त्रियांमधील वाढत्या कर्करोगाच्या समस्यांबद्दल घ्यावयाची काळजी व उपचारपद्धतींबद्दल मार्गदर्शन केले. काही सदस्यांनी आपले अनुभवही बोलके केले अन् कस्तुरी क्लबने दिलेला नवा आत्मविश्वास, उमेद आणि व्यासपीठाविषयी त्या बोलक्या झाल्या. मेघना झुझम यांनी सूत्रसंचालन केले.

मी नेहमीच कस्तुरी क्लबच्या कार्यक्रमात सहभागी होते. या निमित्ताने कस्तुरी क्लबचा वर्धापन दिन साजरा करता आला याचा आनंद आहे. वर्धापन दिनाच्या खूप शुभेच्छा. यापुढेही क्लबच्या उपक्रमांमध्ये असाच सहभाग असेल. कस्तुरी सदस्यांचे सादरीकरण खूप वेगळे आणि ते पाहताना खूप आनंद झाला.

                                           डॉ. रितू दवे, मुंबई ऑन्कोकेअर सेंटर, पुणे

Back to top button