वैद्यकीय मंडळाच्या कार्यकक्षेत सुधारणा; आरोग्य विभागाची मान्यता | पुढारी

वैद्यकीय मंडळाच्या कार्यकक्षेत सुधारणा; आरोग्य विभागाची मान्यता

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात 24 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीतील वैद्यकीय गर्भपातास मान्यता देण्यासाठी स्थायी वैद्यकीय मंडळाच्या कार्यकक्षेत सुधारणा करण्यास राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे 15 जून रोजी मान्यता देण्यात आली.
याबाबतचे पत्र कुटुंबकल्याण कार्यालयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठविण्यात आले आहे. चोवीस आठवड्यांपलीकडील गर्भपाताचा सल्ला देण्यासाठी मुंबईसह राज्यातील 35 जिल्ह्यांत स्थायी वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

या मंडळाकडे गर्भपाताची विनंती आल्यानंतर त्यांना गर्भपातास होकार किंवा नकार देण्याची प्रक्रिया तीन दिवसांत करावी लागणार आहे. यासंदर्भात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नियमावली तयार करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्थायी वैद्यकीय मंडळे स्थापन करण्यात आली आहेत.गर्भपातास मान्यता मिळण्यासाठी जिल्ह्याच्या वैद्यकीय मंडळाकडे विनंती करता येते. हे मंडळ गर्भवती महिलेची व तिच्या अहवालाची तपासणी करून गर्भपात करणे योग्य की अयोग्य, हे ठरविण्याचा निर्णय देते. याबाबत स्थायी वैद्यकीय मंडळाची सुधारित नियमावली निश्चिती करून ती जिल्हा रुग्णालय आणि शासकीय महाविद्यालयाला पाठविण्यात आली आहे.

Back to top button