पुणे: अखेर नाल्यातील राडारोडा उचलणे सुरू | पुढारी

पुणे: अखेर नाल्यातील राडारोडा उचलणे सुरू

धायरी : नर्‍हे आंबेगावातील नाल्यातील राडारोड्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकणार असल्याचे वृत्त दै. पुढारीने प्रसिद्ध केले. या वृत्ताची त्वरीत दखल घेऊन हा राडारोडा उचलण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले. त्याबद्दल परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत असून, दै. पुढारीप्रती आभाराची भावना व्यक्त करीत आहेत.

वडगाव बुद्रुक येथील पाउंजाई मंदिराजवळून वाहत जाणार्‍या नाल्यात म्हशीच्या गोठ्यामागे मोठ्या प्रमाणावर मातीचा राडारोडा टाकण्यात आला होता. हा राडारोडा नवलेब्रीज ते कात्रजपर्यंत होणार्‍या रस्ता रुंदीकरण कामाचा होता. या राडारोड्याने नाल्यातील वाहणार्‍या पाण्याच्या प्रवाहाला मोठा अडथळा निर्माण झाला होता. मागील झालेल्या महाप्रलयात या ओढ्याला मोठा पूर आला होता. या पुराच्या पाण्यामुळे मोठी जीवितहानी होऊन अनेक घरे व इमारतींची पडझड झाली होती. तशाच प्रकारची संभाव्य धोकादायक परिस्थिती टाकलेल्या राडारोड्यामुळे निर्माण झाली होती.

हा नाला नर्‍हे, आंबेगाव भागातून वाहत येत आहे. या नाल्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या वाहत जाणार्‍या नाल्याच्या परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवनमानच धोक्यात आले होते. यामुळे हा मातीचा राडारोडा उचलावा, अशी मागणी करण्यात येत होती.

Back to top button