पुणे: खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालक त्रस्त | पुढारी

पुणे: खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालक त्रस्त

रेंजहिल्स, पुढारी वृत्तसेवा: सरकारी नोकरदारांची वसाहत असलेल्या रेंजहिल्स येथील खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालक अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. अनेक ठिकाणी वाहन घसरून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. सैनिक रुग्णालय रस्ता असो वा रेंजहिल्स सेकंडरी स्कूलजवळील रस्ता, सगळीकडे खड्डेच खड्डे झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी आणि वाहनचालकांनी केली आहे.

रेंजहिल्स भागात रस्त्यावरील खडड्यांची समस्या तशी नवीन नाही. दरवर्षी वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागते. पावसाळ्यात तर वाहनचालकांना येथून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत असून, अनेक ठिकाणी वाहन घसरण्याच्या घटनाही घडल्या आहेत. म्हणूनच, पावसाळ्याचा हंगाम लक्षात घेऊन हे खड्डे खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या संबंधित विभागाकडून बुजविण्यात यावेत, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे.

वाहनचालक हितेश जाधव म्हणाले की, मी रोज नोकरीनिमित्त डेक्कनला जाताना येथून ये-जा करतो. परंतु, एरवीसुद्धा येथे असलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालविणे कठीण होते. पावसाळ्यात मात्र अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आताही या अडचणी येतच असून, हे खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावेत, अशी आमची मागणी आहे.

Back to top button