पुणे : खेड शिवापूर ग्रा.पं. ला ‘आयएसओ’ मानांकन | पुढारी

पुणे : खेड शिवापूर ग्रा.पं. ला ‘आयएसओ’ मानांकन

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : खेड शिवापूर ग्रामपंचायतीने केलेली उल्लेखनीय कामगिरी व कारभाराबाबत तसेच ग्रामस्थांना देण्यात येणार्‍या सेवा व शासकीय नियमानुसार सुरू असलेले काम याबाबत ‘आयएसओ 9001:2015’ मानांकन बहाल करण्यात आले आहे. हे मानांकन शिवगंगा खोर्‍यात प्रथमच आमच्या ग्रामपंचायतीला मिळाले असल्याचा दावा सरपंच अमोल रामदास कोंडे यांनी केला आहे.

खेड शिवापूर गावाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 3 हजार 500 आहे, तर एकूण नागरिकांची संख्या सुमारे 10 हजारांच्या वरती आहे. नागरिकांचा एवढा आकडा लक्षात घेता कर्मचाऱ्यांसह पदाधिकार्‍यांची कामाबाबत दमछाक होत होती. त्यामुळे भविष्यात डिजिटल तंत्रज्ञान वापरून कामकाज करणार असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.

दरम्यान, दीड वर्षापूर्वी सरपंच झालेल्या अमोल कोंडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाचे नूतनीकरण करून सुसज्ज असे वेगवेगळी कार्यालये उभारली आहेत. यामध्ये महिलांसाठी व्यायामाची व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार असलेले कामकाज, ग्रामस्थांना देण्यात येणार्‍या योग्य सुविधा असा पारदर्शी कारभार असल्याने त्याची दखल घेत संबंधित शासनाने ‘आयएसओ 9001:2015’ मानांकन ग्रामपंचायतला देण्यात आले आहे. या वेळी सरपंचांनी सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच राजेंद्र कोंडे, ग्रामसेवक केदारी, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांचे विशेष आभार मानले.

Back to top button