रस्त्याला ओढ्याचे रूप, लोहगाव-वाघोली रस्त्यावरील स्थिती | पुढारी

रस्त्याला ओढ्याचे रूप, लोहगाव-वाघोली रस्त्यावरील स्थिती

येरवडा, पुढारी वृत्तसेवा: पहिल्याच पावसात लोहगाव-वाघोली रस्त्यावरील लोहगावमधील कर्मभूमीनगरजवळ मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी गुडघाभर साचून रस्त्यावर तळे तयार झाले. अनेकांची वाहने त्यातून जाताना बंद पडली. गेल्या अनेक वर्षांपासूनची जुन्या व नव्या हद्दीतील ही समस्या महापालिकेला सोडवता आली नाही, त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने दरवर्षी पाणी साचणार्‍या या ठिकाणी कोणतीच उपाय योजना केलेली नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून राहिले आहे. वाहतुकीसाठी मुख्य रस्ता असल्याने वाहने साचलेल्या पाण्यातून ये जा करत आहेत.

पाण्यात वाहने बंद पडत असून अपघात होत आहेत. या रस्त्यावर पावसाळी लाईन नसल्याने, शिवाय जुन्या हद्दीतील लोकांनी उंच भाग करून घेतल्याने पाण्याचा निचरा न होता ते पाणी साचून राहते. महापालिकेने तातडीने उपाय योजना न केल्यास मुसळधार पावसात नागरिकांच्या घरात पाणी जाण्याची शक्यता आहे. यावर कायमस्वरूपी उपाय योजण्याची मागणी लोहगाव-वाघोली रस्ता नागरिक मंचने महापालिका आयुक्ताकडे केली आहे. मलनिसारण विभागाचे अधिकारी विनायक शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कर्मचारी जागेवर पाठविले होते. पावसाळी लाईन टाकण्यासाठी सर्व्हे करून नियोजन करीत आहोत.’

Back to top button