ढोल-ताशा पथके अडचणीत; दोन वर्षांतील वादनबंदचा परिणाम | पुढारी

ढोल-ताशा पथके अडचणीत; दोन वर्षांतील वादनबंदचा परिणाम

सुवर्णा चव्हाण

पुणे : पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे ढोल-ताशा पथकांचा निनाद आलाच. पण, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत गणेशोत्सव मिरवणुकीत वादन न झाल्यामुळे अन् काही निधी विविध उपक्रमांसाठी खर्ची झाल्याने पुण्यातील काही ढोल-ताशा पथके आर्थिक अडचणीत सापडली आहेत. काही पथकांनी आपले काही ढोल-ताशे विकायला काढले असून, यंदाच्या गणेशोत्सवासाठी पथकांपुढे आर्थिक निधी उभा करण्याचे मोठे आव्हान आहे. दरवर्षी पुण्याच्या गणेशोत्सवात पथकातील तरुण-तरुणींच्या बेधुंद वादनाने मिरवणूक खास बनते. पण, दोन वर्षांत पथकांनाही अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागल्याने काही पथकांकडे यंदाच्या वर्षी खर्चासाठी पैसे नाहीत. त्यामुळे निधीचा प्रश्न गंभीर बनला आहे. ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर म्हणाले, ‘पुण्यात 120 नोंदणीकृत ढोल-ताशा पथके आहेत.

कोरोनामुळे दोन वर्षे गणेशोत्सव मिरवणुकीत वादन झाले नाही. पण, दोन वर्षांत आपल्या आर्थिक निधीतून पथकांनी अनेक सामाजिक उपक्रम केले. वेगवेगळ्या उपक्रमांसाठी त्यांनी पैसे खर्च केले. आता त्यांच्यासमोर अनेक आर्थिक आव्हाने आहेत. पथकांना आर्थिकदृष्ट्या नव्याने पुन्हा उभे राहण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.’ गेल्या दोन वर्षांत वादन नसल्यामुळे वाद्ये खराब झाली आहेत, त्यासाठीचा खर्चही त्यांना करावा लागेल. अनेकांपुढे सराव आणि वादन कुठे करायचे, यंदा मंडळांपुढे वादन करायला मिळेल का नाही? हाही प्रश्न आहे. पण, पथकांमध्ये कमालीचा उत्साह आणि जोश असून, ते या अडचणी नक्कीच दूर करतील. पथकांच्या सहकार्यासाठी महासंघ उभा राहील.’

काही ढोल-ताशा पथके निश्चितच आर्थिक अड़चणीत आहेत. कोरोनाची झळ पथकांनाही बसली आहे. यंदाच्या वर्षी सुरुवात करायलाही पथकांकडे पैसे नाहीत. त्यामुळेच आर्थिक निधी कसा उभा करायचा, हा प्रश्न पथकांसमोर आहे. आमच्या पथकातील पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन काही निधी गोळा केला असून, सगळ्यांनी पथकासाठी मार्ग काढायचे ठरविले आहे.

                           -अनिश पाडेकर, वंदे मातरम् संघटनाकृत युवा वाद्य पथक

दोन वर्षे वादन नव्हते. त्यामुळे ढोल-ताशेही खराब झाले आहेत. दोर्‍या कुजल्या आहेत. फक्त पिंप शाबूत राहिले आहेत, असे नुकसान काही पथकांचे झाले आहे. काही पथकांनी तर यंदा आर्थिक अडचणीमुळे आपली वाद्ये विकायला काढली आहेत. पथकांकडे शिल्लक निधी नाही, त्यामुळे पथकांसमोर खूप मोठी आव्हाने आहेत. पथकांना नव्याने उभे राहावे लागणार आहे आणि वाद्यांची नव्याने खरेदी करावी लागेल.

                                 -अतुल बेहेरे, अध्यक्ष, नादब्रह्म ढोल-ताशा पथक

 

Back to top button