ससूनची वैद्यकीय प्रक्रिया होणार वेळखाऊ; एचएमआयएस सिस्टिम बंद | पुढारी

ससूनची वैद्यकीय प्रक्रिया होणार वेळखाऊ; एचएमआयएस सिस्टिम बंद

पुणे : पुढारी वृत्तसेवा: डॉक्टरांना रुग्णांचे वैद्यकीय अहवाल ऑनस्क्रीन उपलब्ध व्हावेत, सिटी स्कॅन, एमआरआय यांचे रिपोर्टही सहज संगणकीय प्रणालीवर पाहता यावेत यासाठी राज्य शासनातर्फे हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम सुरू करण्यात आली होती. ही प्रणाली अचानक बंद करण्यात आल्याने ससून सर्वोपचार रुग्णालयात बुधवारी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. रुग्णांची नोंद कागदावर करावी लागत असल्याने आणि त्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने रुग्णांना ताटकळत थांबावे लागले.

राज्यातील 16 वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये 2009 पासून हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम हा प्रकल्प राबवला जात आहे. रुग्णांचा वेळ वाचावा, डॉक्टरांना रुग्णांची तपासणी करताना पूर्वीच्या नोंदी सहज पाहता याव्यात आणि उपचार पद्धतीमध्ये गती यावी यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरत होती. मंगळवारी रात्री अचानक ही यंत्रणा अद्ययावत नसल्याचे कारण पुढे करत अचानक बंद करण्यात आली. या निर्णयाचा फटका राज्यातील सुमारे 16 हजार रुग्णांना बसणार आहे.

बुधवारी रुग्णांच्या नोंदणीसाठी तीनच कर्मचारी उपलब्ध असल्याने प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ लागत होता. एरवीच रुग्णांना ससून रुग्णालयात केस पेपर काढणे, डॉक्टरांना भेटणे, तसेच इतर कामांसाठी संपूर्ण दिवस खर्च करावा लागतो. संगणकीय प्रणाली बंद पडल्याने वैद्यकीय प्रक्रिया आणखी वेळखाऊ होण्याची भीती रुग्णांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी आणि गुरुवारी ससूनमध्ये रुटीन ओपीडी असते.

या दोन्ही दिवशी काय गोंधळ उडणार आणि त्यावर काय उपाययोजना करायच्या याबाबत रुग्णालय प्रशासनाला सतर्क राहावे लागणार आहे. रुग्णांवरील उपचार, औषधे, एक्स-रे, एमआरआय, सिटी स्कॅन, त्यांच्या चाचण्या वगैरे सगळी माहिती एचएमआयएस या आधुनिक तंत्रज्ञानामुळे संगणकाच्या एका क्लिकवर डॉक्टरांना मिळत होती. ही यंत्रणाच बंद करण्यात आल्याने नुकसान सहन करावे लागणार आहे.

Back to top button