पुणे : मुळशी तालुक्यात पावसाची संततधार | पुढारी

पुणे : मुळशी तालुक्यात पावसाची संततधार

पौड : पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यात मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे ओढे, नाले वाहू लागले असून मुळा व वळकी नदीला पाणी वाहू लागले आहे.

जून महिना कोरडा गेल्याने मुळशी तालुक्यात असलेल्या मुळा आणि वळकी नदी कोरड्याठाक पडल्या होत्या. मुळशी धरणातही पाणीपातळी खालावल्याने धरणातून मुळा नदीत सोडण्यात येणारे पाणी बंद झाले होते. तर, कोळवण भागात असणारे हाडशी येथील दोन आणि वाळेण येथील बंधाराही कोरडा पडला होता.

शेतीसाठी दोन्ही नद्यांतून मोठ्या प्रमाणात उपसा सुरू असल्याने, तसेच जून महिन्यात एकही मोठा पाऊस न झाल्याने मुळा व वळकी नद्या कोरड्याठाक पडल्या होत्या. मात्र, मुळशी तालुक्यात गेल्या चार दिवसांत पावसाची संततधार सुरू असून, अधूनमधून पावसाच्या मोठ्या सरीदेखील कोसळत आहे. त्यामुळे शेतीसाठी पोषक वातावरण तयार झालेले असून, भातशेतीसाठी शेतकरी वर्गाची लगबग सुरू झाली आहे.

Back to top button