जीवन प्राधिकरण अभियंत्यासह दोघांना अटक | पुढारी

जीवन प्राधिकरण अभियंत्यासह दोघांना अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडीच्या इलेक्ट्रिक व वॉटर प्युरिफायरच्या कामाच्या अंदाजपत्रकास मंजुरी व टक्केवारीसाठी लाचेची मागणी करत अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या जीवन प्राधिकरणाच्या तांत्रिक अभियंत्यासह शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात क्लास वन अधिकारी असलेला यांत्रिकी अभियंता किरण अरुण शेटे (31) आणि परमेश्वर बाबा हेळकर (49) अशी कारवाई करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत एका लेबर कॉन्ट्रॅक्टरने एसीबीकडे धाव देऊन याबाबत तक्रार दिली होती.

तक्रारदार हे कामगार ठेकेदार असून, त्यांनी खेड येथील अंगणवाडीच्या इलेक्ट्रिक व वॉटर प्युरिफायरच्या कामाच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळावी, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामधील शेटे आणि हेळकर यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र, शेटे आणि हेळकर हे मंजूर होणार्‍या अंदाजपत्रकातील रकमेच्या 2 टक्के रकमेची मागणी करत होते. तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबीकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. त्यावर सापळा रचत एसीबीने प्रथमश्रेणी व द्वितीय श्रेणीच्या अभियंत्यांना बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी महापालिकेतील उपायुक्ताला अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटक झाली. सलग दुसर्‍या दिवशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी लाच घेताना एसीबीच्या हाताला लागले आहेत.

Back to top button