रवी कोपनर
कात्रज : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील लेन क्रमांक 12 मध्ये ड्रेनेजलाइन तुंबून मैलायुक्त पाणी रस्त्यावरून वाहत सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये जात आहे. ड्रेनेजच्या वाहत्या पाण्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. परंतु, महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सहा महिन्यांपूर्वीच या ठिकाणी ड्रेनेजलाइनचे काम करण्यात आले. मात्र, तरीही 'परिस्थिती जैसे थे' आहे.
मैलायुक्त पाणी सोसायटीत येत असेल तर इथे राहायचे कसे? लेन क्रमांक 12 मधील ड्रेनेजचे चेंबर तुंबले असून, त्यामधून एखाद्या ओढ्यासारखे पाणी वाहत आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी संपूर्ण रस्त्यांवरून जाऊन ओढ्याला मिळते. संपूर्ण रस्ता ड्रेनेजच्या पाण्याने व्यापून टाकला असल्याने नागरिकांनी चालायचे कसे? हा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 3-4 हजार नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्यावर पावसाळी वाहिनीला कोठेतरी ड्रेनेजलाइन जोडण्यात आली असावी. त्यामुळे हा प्रकार घडत असावा. यापुढे नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. तसेच, ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येऊ नये म्हणून उपाय योजण्यात येतील.
– शशिकांत निवदेकर, कनिष्ठ अभियंता, ड्रेनेज विभाग