सांगवी परिसराला पावसाची हुलकावणी; आकाशात काळ्याकुट्ट ढगांची दाटी | पुढारी

सांगवी परिसराला पावसाची हुलकावणी; आकाशात काळ्याकुट्ट ढगांची दाटी

सांगवी : पुढारी वृत्तसेवा: सांगवी (ता. बारामती) परिसरात जून महिना संपून जुलै महिन्यातील पहिला आठवडा संपत आला, तरी अद्यापही जोरदार पाऊस काही पडलेला नाही. गेला एक महिना आकाशात नुसतीच काळ्याकुट्ट ढगांची दाटी झालेली पाहायला मिळते. परंतु, जोरदार पाऊस काही पडत नाही. पाऊस लांबणीवर जात असल्याने शेतीकामांचे नियोजन कोलमडले आहे. सांगवी परिसर हा बागायती पट्ट्यात मोडला जातो. शेतीसाठी कालव्याचे आणि नदीचे पाणी उपलब्ध असले, तरी जोरदार पाऊस न झाल्याने जमिनीची धग अजूनही कायम आहे. सोयाबीन, घेवडा यासह द्विदल पिकांसाठी जोरदार पावसाची आवश्यकता असते.

या भागात बहुतेक शेतकरी उसाच्या लागवडीत मग्न आहेत. परंतु, उसाच्या जोमदार वाढीसाठी बेवड म्हणून आंतरपिके घेतली जातात. आंतरपिकांच्या जोमदार वाढीसाठी जोरदार पावसाची गरज आहे. सांगवी परिसराच्या आजूबाजूला जोरदार पाऊस होतो आहे. परंतु, या भागात आजतागायत जोरदार पाऊस काही पडलेला नाही. ज्या शेतकर्‍यांना विहीर किंवा नदीच्या पाण्याची सोय आहे, त्यांनी उसासह इतर पिके घेतली आहेत. मात्र, या भागातील बहुतांश शेतकरी निरा डावा कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

त्यांना पावसाची नितांत गरज आहे. कालव्यावर अवलंबून असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या मोठी आहे. एकूणच, सांगवी परिसर बागायती पट्ट्यात मोडला जात असला, तरी पेरण्यांसाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे. परिणामी, बहुतांश शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. मंगळवारीही (दि. 5) दुपारी पाच वाजेपर्यंत आकाशात नुसत्याच काळ्याकुट्ट ढगांची गर्दी दिसत होती. परंतु, जोरदार पाऊस काही पडत नव्हता.

Back to top button