जिल्हा परिषद, पंचायत समिती गणांचा आरक्षण कार्यक्रम जाहीर | पुढारी

जिल्हा परिषद, पंचायत समिती गणांचा आरक्षण कार्यक्रम जाहीर

पुणे : पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेचे 82 गट, तर त्याच्या दुप्पट 164 पंचायत समिती गण निश्चित झाले असून, अंतिम प्रभागरचनाही प्रसिद्ध झाली आहे. आता 13 जुलै रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यात जिल्हा परिषद गटांची जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत तहसीलदार यांच्या उपस्थित होणार आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2022 साठी निर्वाचन गट आणि गणांची प्रभागरचना अंतिम झाली. नव्या रचनेनुसार 82 गटांची निर्मिती झाली, तर त्याच्या दुप्पट 164 गण तयार झाले. त्यानुसार, आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

त्यात अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षण सोडतीची सूचना 7 जुलैला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 13 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद गट आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. जिल्हाधिकारी 15 जुलै रोजी आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणार आहेत. 15 ते 21 जुलैदरम्यान, आरक्षणावर हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत.

25 जुलैला आरक्षणावर प्राप्त झालेल्या हरकती व सूचना राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्या जातील. 29 जुलै रोजी राज्य निवडणूक आयोग हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी यांचे अभिप्राय घेऊन आरक्षणास मान्यता देतील. तर राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर 2 ऑगस्ट रोजी आरक्षणाचे राजपत्र जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतील, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

असे असेल आरक्षण..
पुणे जिल्हा परिषदेचे 82 गट आणि 164 गण आहेत. यातील 41 गट हे महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. अनुसूचित जातींसाठी आठ गट आरक्षित असून, त्यातील चार गट हे महिलांसाठी आरक्षित होणार. अनुसूचित जमाती प्रवर्गातील सहा गट आरक्षित आहेत. त्यातील तीन महिलांसाठी आरक्षित असतील. सर्वसाधारण गटातील 68 गट आहेत, त्यातील 34 गट हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होतील. पंचायत समित्यांचे 164 गण आहेत, त्यातील 82 जागा या महिलांसाठी असणार आहेत. एकूण गणांपैकी 139 गण हे सर्वसाधारण असून, त्यातील 68 जागा या महिलांसाठी आरक्षित होणार आहेत. अनुसूचित जातीसाठी एकूण 15 गण आहेत, त्यातील नऊ गण हे महिलांसाठी, तर अनुसूचित जमातीकरिता एकूण 10 गण आरक्षित असून, त्यातील पाच गण हे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात येतील.

हेही वाचा

कोंडेश्वर व बारवी धरण परिसरात ‘नो सेल्फी’

सांगली : प्राथमिक शिक्षक बँकेत सत्तांतर

मंत्रिपदाचा फैसला ११ जुलैनंतरच

Back to top button