फिरायला जाताय? मग काळजी घ्या! जिल्हा प्रशासनाचे पर्यटकांना आवाहन

फिरायला जाताय? मग काळजी घ्या! जिल्हा प्रशासनाचे पर्यटकांना आवाहन

पुणे : पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील धरण आणि पर्यटनक्षेत्रात पाऊस होत असून, पर्यटकांची पावले निसर्गाच्या सान्निध्यात वळू लागली आहेत. मात्र, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याने पर्यटनासाठी बाहेर पडणार्‍यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पाऊस बरसायला लागला की नदी-नाले वाहू लागतात, डोंगर-कपारीत धबधबे कोसळतात. परिसर हिरवागार होतो, अशा वातावरणाचा आनंद घेण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही. विशेषत: तरुणाई मोठ्या प्रमाणात पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडते. मात्र, अशा वेळी खबरदारी नाही बाळगली, तर ते दुर्घटनेला आमंत्रण ठरते.

त्यामुळे भटकंती करणार्‍यांनीच नाही, तर सर्वांनी पावसाळ्यात काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाचा आनंद जरूर घ्यावा. मात्र, वादळ, मेघगर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना बाहेर जाणे टाळावे. मोकळ्या जागेत असल्यास आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल, तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. घरातील विद्युत उपकरणे चालू असतील, तर त्वरित बंद करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पूर आल्यास काय कराल?
पूर पाहायला जाणे टाळावे, पूर परिस्थितीत मदतकार्य सुरू असताना त्यात अडथळा येईल, असे वर्तन करू नये. पूर प्रवाहात प्रवेश करू नये. सिवरेज लाईन, गटारे, नाले, पूल, नदी, ओढे इत्यादीपासून दूर राहावे. विद्युत खांब आणि पडलेल्या वीजलाइनपासून दूर राहावे. ओपन ड्रेन किंवा धोक्याच्या ठिकाणी चिन्हे (लाल झेंडे किंवा बॅरिकेड्स) लावा. पुराच्या पाण्यात चालू नका किंवा गाडी चालवू नका.

माहिती घ्या, अफवा टाळा!
पूर येण्यापूर्वी नागरिकांनी व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर समाजमाध्यमांवर कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये. आपत्कालीन परिस्थितीसाठी 'एसएमएस'चा उपयोग करावा. आपला मोबाईल चार्ज करून ठेवावा. हवामानातील बदलांची अद्ययावत माहिती रेडिओ, टीव्हीवर पाहत राहावी. गुरेढोरे, पशूंच्या सुरक्षिततेची सोय सुनिश्चित करून घ्यावी.

टूरवर गेल्यावर अशी घ्या काळजी
आवश्यक वस्तूसह आपत्कालीन कीट तयार ठेवावे. आपली कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू जलरोधक पिशवीत जवळ ठेवावे. जवळपास असलेला निवारा, पक्क्या घराकडे जाण्यासाठी सुरक्षित मार्ग जाणून घ्यावा. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी सरकारी अधिकार्‍यांच्या निर्देशनाचे पालन करावे. कमीत कमी एका आठवड्यासाठी पुरेसे खाण्याजोगे अन्न आणि पिण्यासाठी पाणी साठवा, पूर असलेल्या क्षेत्रातील कालवे, नाले, ड्रेनेज वाहिन्यांपासून नागरिकांनी सतर्क राहावे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news