पुणे : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 31 पर्यंत मुदत | पुढारी

पुणे : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 31 पर्यंत मुदत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगाम 2022-23 किरता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकर्‍यांना 31 जुलैपर्यंत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. पीक विमा योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असून, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांना योजना ऐच्छिक आहे.

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदाराव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेंतर्गत सर्व पिकांसाठी 70 टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून, शेतकर्‍यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकर्‍यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के, असा मर्यादित ठेवण्यात आला आहेत.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये प्रामुख्याने हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान आणि नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान, अशा जोखमीच्या कारणांमुळे होणार्‍या पिकांच्या नुकसानीस विमासंरक्षण दिले जाणार आहे.

Back to top button