महंमदवाडीत वाहतुकीची ऐशीतैशी बेशिस्त चालकामुळे चौकाचौकांत जाम | पुढारी

महंमदवाडीत वाहतुकीची ऐशीतैशी बेशिस्त चालकामुळे चौकाचौकांत जाम

कोंढवा : पुढारी वृत्तसेवा : बेशिस्त वाहनचालकांमुळे महंमदवाडी, उंड्री परिसरातील चौकाचौकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. स्थानिक नागरिक, व्यावसायिक वैतागून गेले आहेत. बेशिस्त चालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. महंमदवाडी, कडनगर, होलेवस्ती, उंड्री चौक परिसरात दररोज वाहतूक कोंडी होते.

यामध्ये स्कूल बस व पाण्याच्या टँकरचा समावेश प्रामुख्याने दिसून येतो. महंमदवाडी उंड्री परिसरात अनेक शाळा आहेत. विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला चौकामध्ये वाहतूक कोंडी होते. पालकांना व विद्यार्थ्यांना नियमांचे धडे देणार्‍या शाळा प्रशासनाने आपल्या स्कूल बसचालकांकडून रस्त्यावर होणार्‍या वाहतूक कोंडीकडे लक्ष द्यायला हवे.

एखादा अपघात झाला, तर याला जबाबदार कोण? आठवड्यातून एकदा स्कूल बसचालकांना वाहतूक नियमांची आठवण करून देणारा एखादा वर्ग भरविणे गरजेचे आहे.

यामुळे होतेय कोंडी…
सोसायट्यांमध्ये पाण्याच्या ट्रिपा जास्तीत जास्त व्हाव्यात, यासाठी पाण्याचे टँकरचालक भरधाव वेगात असतात. शाळेत मुलांना वेळेत पोहचविण्यासाठी स्कूल बसचालक सुसाट असतात. शाळेच्या आवारात बस न थांबवता स्कूल बस रस्त्यावर थांबवून विद्यार्थ्यांना बसविणे व उतरविणे करीत असल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही या परिसरातील वाहतूक कोंडीचे मूळ कारण आहे.

Back to top button