पिंपरी : 20 ड्रायव्हिंग स्कूलमध्ये त्रुटी | पुढारी

पिंपरी : 20 ड्रायव्हिंग स्कूलमध्ये त्रुटी

पिंपरी : शहरातील 188 ड्रायव्हिंग स्कूलपैकी तीस बंद अवस्थेत तर वीस स्कूलमध्ये त्रुटी असल्याचे समारे आले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने संबंधितांना नोटीस दिली आहे. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने काही दिवसांपूर्वी शहरातील नोंदणीकृत असलेल्या ड्रायव्हिंग स्कूलची पडताळणी केली.

यामध्ये दोषी आढळलेल्या बेकायदा ड्रायव्हिंग स्कूलवर कारवाई होणार का, असा प्रश्न राज्य मोटार ड्रायव्हिंग असोसिएशनने केला आहे. काही वाहन प्रशिक्षण केंद्रांच्या पत्त्यामध्ये बदल झालेला आहे. तर, काहींच्या वाहनांची अवस्था दयनीय झाली आहे. परिणामी यामुळे चालकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो.

या कारणामुळे त्यांना नोटीस देण्यात आली आहे. तर, कोरोनाकाळात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही जणांना प्रशिक्षण केंद्र सुरू ठेवणे शक्य नसल्याने त्यांनी बंद केल्याचे समोर आले आहे. शहरात काही प्रशिक्षण केंद्र बेकायदा सुरू असून, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप राज्य मोटार ड्रायव्हिंग असोसिएशनने केला आहे. प्रत्यक्षात अशा स्कूलमधून शहरातील नागरिकांना प्रशिक्षण दिले जात असेल तर हा प्रकार धोकादायक व शासनाची फसवणूक करणारा आहे. यामुळे आरटीओच्यावतीने अशा स्कूलवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

शहरातील नोंदणीकृत वाहन प्रशिक्षण केंद्रांची पाहणी करण्यात आली आहे. बंद केंद्रांची माहिती संकलित केली आहे. तसेच, त्रुटी असलेल्या स्कूलला दोन आठवड्यांच्या मुदतीत कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र, याव्यतिरिक्त शहरात बेकायदा प्रशिक्षण केंद्र सुरू असतील तर त्याबाबत नागरिकांनी माहिती द्यावी. आम्ही संबंधितांवर तत्काळ कारवाई करू.
– अतुल आदे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

नोंदणीकृत वाहन प्रशिक्षण केंद्रांची पाहणी दर पाच वर्षांनी केली जाते. मात्र, शहरात बर्‍याच ठिकाणी परवाना न घेता ड्रायव्हिंग स्कूल सुरू आहेत. याबाबत सर्वत्र चर्चा आहे. त्यावर आरटीओची कारवाई होत नाही. अशा केंद्रचालकांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.
– अनंत कुंभार, वरिष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग असोसिएशन

Back to top button