पिंपरी : पावसाने तुंबलेले ड्रेनेजचे पाणी घरात | पुढारी

पिंपरी : पावसाने तुंबलेले ड्रेनेजचे पाणी घरात

पिंपरी : पावसामुळे ड्रेनेज तुंबून पाणी घरात येत आहे. तसेच रस्त्यांची उंची घरांपेक्षा जास्त असल्याने पावसाचे पाणी घरात येत असल्याच्याही तक्रारी सोमवारी (दि.4) ग क्षेत्रीय कार्यालय जनसंवाद सभेत नागरिकांनी केल्या. प्रभात कॉलनी रहाटणी येथील दुर्गेश धुमाळ यांनी थोडा पाऊस पडला, तरी घरामध्ये ड्रेनेजचे पाणी येत असल्याची तक्रार केली. याच भागातील गुरु मागाडे यांनी रस्त्यांची उंची घरांपेक्षा जास्त झाल्याने पाणी घरात येत असल्याचे सांगितले. .

जय मल्हार नगर थेरगाव येथील उर्मिला म्हसवडे यांनी ड्रेनेज चोकअप होत असल्याचे सांगितले. मिलिंद राजे भोसले यांनी रहाटणी फाटा येथे दिव्यांगांसाठी स्वच्छतागृह बांधावे तसेच चौका,चौकात टॉयलेट बांधण्याची मागणी केली. शिवराम शिंदे यांनी अशोका सोसायटी येथे गतिरोधक बसविण्याची मागणी केली. सुरेखा बहिरट यांनी महापालिकेने पेव्हिंग ब्लॉकची कामे केली. मात्र, हे पेव्हिंग ब्लॉक उचकटले असल्याचे निदर्शनास आणून दिले.

निनाद वाडकर यांनी थेरगाव येथील अनधिकृत बांधकामे पाडण्याची मागणी केली. आनंद सुतार यांनीही अतिक्रमणे काढण्याची मागणी केली. जय मल्हार नगर थेरगाव येथील गणेश खिलारे यांनी रस्त्यावरील अतिक्रमणे काढावी तसेच ठिकठिकाणी गटारी तुंबली आहेत, चोकअप काढणार्‍या गाड्या पाठविण्याची मागणी केली. गणेश बारणे यांनी नाल्याबाहेरची अतिक्रमणे काढावी, पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेची कामे करावीत, अशी मागणी केली.

श्रीनगर, रहाटणी येथील प्रदीप दळवी यांनी आधार कॉलनी येथे ड्रेनेज उंच करण्याची मागणी केली. अशोका सोसायटीजवळील रुबीना खान यांनी तेथील अनधिकृत भिंत हटविण्याची मागणी केली. मनीषा मेहेर यांनी आनंदघन सोसायटी थेरगाव फाटा येथे नालासफाई होत नसल्याने दुर्गंधी येत असल्याचे सांगितले. मनिषा तरडे व पवन चौधरी यांनी अशोका सोसायटी ते काळेवाडी फाटा दरम्यान वाहने जोरात असतात त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी केली. युवराज दाखले यांनी अण्णाभाऊ साठे वाचनालय पुन्हा सुरू करावे, अशी मागणी केली. थेरगाव येथील साजिद शेळके यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.

Back to top button