पुणे जागतिक गुंतवणुकीचे केंद्र व्हावे; पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांची अपेक्षा | पुढारी

पुणे जागतिक गुंतवणुकीचे केंद्र व्हावे; पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांची अपेक्षा

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ‘मेट्रो, रिंगरोड यांसारख्या पूरक पायाभूत सुविधा आपण उपलब्ध करून दिल्यास आगामी काळात पुणे हे नक्कीच गुंतवणुकीसाठी एक आकर्षक ‘डेस्टिनेशन’ बनेल,’ असा विश्वास पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी व्यक्त केला. पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशनतर्फे (पीसीईआरएफ) नुकतीच बोट क्लब येथे आयोजित कार्यक्रमात जानेवारी 2023 महिन्यात होणार्‍या ‘कॉन्स्ट्रो’ या बांधकाम व्यवसायसंबंधी भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या आयोजनाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

त्या वेळी डॉ. दिवसे बोलत होते. या वेळी शिरीष केंभावी, जयदीप राजे, विश्वास लोकरे, जयंत इनामदार आणि संजय वायचळ आदी उपस्थित होते. डॉ. दिवसे म्हणाले, ‘पुणे महानगरात अनेक अशी क्षेत्रे आहेत, जी या महानगरासाठी आर्थिक स्रोत ठरू शकतात. पुण्यात जागतिक स्तरावरील गुंतवणूक आकर्षित करण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठीच पीएमआरडीए ही संस्था विविध प्रकल्प राबवीत असून, पुणे हे जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनावे, यासाठी ‘कॉन्स्ट्रो’ प्रदर्शन नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यामुळेच पुढील काळात या प्रदर्शनाच्या आयोजनात ‘पीएमआरडीए’चा कायमस्वरूपी सहभाग राहील.

 

Back to top button