तीन वाहनांना ठोकरले; मायलेकासह तिघे ठार | पुढारी

तीन वाहनांना ठोकरले; मायलेकासह तिघे ठार

पौड : पुढारी वृत्तसेवा: पुणे-कोलाड महामार्गावरील लवळे फाटा येथे फरशी घेऊन जाणार्‍या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात मायलेकांसह तिघांचा मृत्यू झाला. तर, सहा जण जखमी झाले. रश्मी पवन पटेल (वय 30) व रिहांश पवन पटेल (वय 9 महिने) अशी त्यांची नावे आहेत. एका महिलेची ओळख पटली नाही. हा अपघात रविवारी सायंकाळी 6 च्या सुमारास झाला. मुळशी तालुक्यातील पुणे-कोलाड महामार्गावरील लवळे फाटा येथून फरशीने भरलेला ट्रक पौडच्या दिशेने जात होता. या वेळी ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने पुढे प्रवाशांसह असलेल्या दोन दुचाकी व एक चारचाकी अशा तीन वाहनांना ट्रकने मागून जोरदार धडक दिली.

त्यात दुचाकीवर असलेल्या 9 महिन्यांच्या बाळासह आईचा जागीच मृत्यू झाला. तसेच, सहा जण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. पाऊस, तसेच रविवार असल्याने मुळशी तालुक्यात फिरायला आलेल्या नागरिकांमुळे लवळे फाटा येथे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. सहायक पोलिस निरीक्षक रमेश गायकवाड, पोलिस नाईक राजेश गायकवाड यांनी घटनास्थळावर धाव घेत जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करीत वाहतूक सुरळीत केली.

Back to top button