

पुणे, पुढारी वृत्तसेवा: अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशातील पहिल्या फेरीत 89 हजार 911 विद्यार्थ्यांना प्रवेश दिले होते. त्यापैकी 23 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश संस्थात जावून कन्फर्म केले आहेत. तर 55 हजार विद्यार्थ्यांनी बेटरमेंट (पुढील फेरीसाठी संधी) ठेवली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत पसंतीची संस्था मिळाली नाही अशा विद्यार्थ्यांना दुसर्या कॅप राउंडमध्ये संधी घेण्यासाठी संस्था पसंतीक्रम बदलण्याची मुभा 29 ऑक्टोबर पर्यंत देण्यात आली आहे. त्यानंतर 31 ऑक्टोबरला दुसर्या कॅप राउंडमधील प्रवेशा यादी जाहीर होणार आहे.
राज्यात प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या सुमारे 1 लाख 28 हजार 124 जागांसाठी पहिल्या कॅप राउंडसाठी 1 लाख 23 हजार 649 विद्यार्थ्यांनी संस्था पसंतीक्रम भरुन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 89 हजार 911 विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट झाले होते. या विद्यार्थ्यांना 19 ते 21 ऑक्टोबर या काळात प्रवेश पूर्ण करण्याचा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत 23 हजार 160 प्रवेश घेतले आहे. तर पुढील यादीत 55 हजार 965 विद्यार्थ्यांना बेटरमेंटची संधी देण्यात आली आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय 9 हजार 56 विद्यार्थ्यांना मिळाले आहे. अर्ज भरलेल्यापैकी 33 हजार 738 विद्यार्थी प्रतिक्षेत असून या विद्यार्थ्यांना दुसर्या कॅप राउंड मध्ये संधी मिळते का पहावे लागणार आहे. प्रवेशाच्या तीन फेर्या होणार आहेत. या फेरीसाठी नव्याने विकल्प देण्याची विद्यार्थ्यांना संधी 29 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली आहे. आणि येत्या 31 ऑक्टोबरला दुसर्या कॅप राउंडची यादी जाहीर होणार आहे.