पुरंदरला ग्रामसडक योजनेतून 25 कोटी
सासवड; पुढारी वृत्तसेवा : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 5 रस्त्यांना 25 कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे, अशी माहिती माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
तीन वर्षांत पुरंदर तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा एक रुपया निधी आला नाही महाविकास आघाडी सरकारने निधीच्या बाबतीत केलेली पुरंदर-हवेलीची उपेक्षा एकाच अधिवेशनात धुवून काढली आहे. ग्रामीण भागातील जवळपास 30 किलोमीटर रस्त्यांची कामे या निधीतून पूर्णत्वास जाणार आहेत. याशिवाय आणखी निधी विविध माध्यमांतून मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही शिवतारे यांनी सांगितले.
या वेळी पोंढे येथील हनुमंत वाघले,युवराज वाघले,तुषार वाघले,आकाश वाघले,मोहन वाघले व राजुरी येथील कृष्णा भगत,अंकुश भगत,अशोक भगत,विपुल भगत,अनिल भगत,पांडुरंग भगत आदी ग्रामस्थांनी राजुरी पोंढे रस्त्याची मागणी केली होती. येथील धनगर समाजानेही या रस्त्यासाठी वारंवार निवेदने दिली होती. या पार्श्वभूमीवर या रस्त्याला 7 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. पिसर्वे-माळशिरस रस्त्यासाठी सरपंच बाळासाहेब कोलते,रवींद्र कोलते,संतोष यादव,शरद यादव,राजेंद्र गद्रे,आप्पा कोलते,संतोष सोपाना कोलते यांची आग्रही मागणी होती. त्यानुसार या रस्त्याला ही मंजुरी देण्यात आली आहे.
मंजूर रस्त्यांचा तपशील खालीलप्रमाणे
1) राजुरी-पोंढे रस्ता :- 7.01 कोटी
2) पांगारे-हरगुडे रस्ता :- 4.54 कोटी
3) पिसर्वे-माळशिरस रस्ता :- 4.84 कोटी
4) माहूर-तोंडल रस्ता :- 3.41 कोटी
5) जेऊर-पिसुर्टी वाल्हा रस्ता :- 5.12 कोटी