पुणे : जिल्ह्यातील 19 ग्रा.पं.चे बिगुल वाजले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जानेवारी 2021 ते अगदी सप्टेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्या, त्याचबरोबर नव्याने स्थापित झालेल्या पुणे जिल्ह्यातील 19 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीची तारीख 5 जुलै रोजी जाहीर केली जाईल. त्यानंतर 12 ते 19 जुलै यादरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.
उमेदवारी अर्जांची छाननी 20 जुलै रोजी होईल. 22 जुलै हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असेल. त्यात दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाईल. चार ऑगस्ट रोजी मतदान होईल, मतमोजणी दुसर्याच दिवशी पाच ऑगस्टला होणार आहे. हवेली तालुक्यातील पाच, शिरूर सहा, इंदापूर चार, बारामती व पुरंदर प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे.
दरम्यान, कोरोनामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्या असून, 2022 मध्ये मुदत संपणार्या आणि नव्याने स्थापित झालेल्या अशा एकूण 303 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. या ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत काढण्यात आली असून, त्यातून ओबीसी आरक्षण वगळून अनुसूचित जाती आणि जमातींचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. आता या ग्रामपंचायतींची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.