वर्षाविहारासाठी पर्यटक मुळशीत | पुढारी

वर्षाविहारासाठी पर्यटक मुळशीत

पौड : पुढारी वृत्तसेवा: मुळशी धरण परिसरात गेल्या चार दिवसापांसून पडत असलेल्या पावसाने धबधबे ओसंडून वाहू लागले असून, पर्यटकांची पावले पर्यटनासाठी मुळशीकडे वळली असून, तालुक्यात वर्षाविहारास आरंभ झाला आहे. मुळशी धरण परिसरातील प्रसिद्ध पळसे धबधबा, ताम्हाणी घाट, वांद्रे येथील पिंपरी दरी पॉइंट तसेच धरणाच्या कडेने असलेल्या छोट्या मोठ्या धबधब्यावर पर्यटकांनी शनिवार, रविवार मोठी गर्दी केली होती.

धरण भागात मुख्य रस्त्यापासून धबधबे लांब असून, आलेल्या पर्यटकांनी आपली वाहने रस्त्यावरच लावल्याने वाहतूक कोंडी झालेली दिसून येत होती. गेली दोन वर्षे कोरोनामुळे वर्षाविहारास शासनाकडून बंदी घालण्यात आली होती. मात्र, यावर्षी कोणतीही बंधने नसल्याने पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर मुळशीकडे धाव घेतली. यामुळे तालुक्यातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेलेले होते. आलेल्या पर्यटकांवर अंकुश ठेवण्यासाठी पौड पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Back to top button