विमानाची बनावट तिकिटे; 12 लाखांची फसवणूक | पुढारी

विमानाची बनावट तिकिटे; 12 लाखांची फसवणूक

चाकण : पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी विविध विमान कंपन्यांच्या प्रवासाची बनावट तिकिटे बनवून नागरिकांना विकून 12 लाख रुपयांची फसवणूक करण्याची घटना चाकणमध्ये घडली. सदर प्रकार 28 नोव्हेंबर 2021 ते 30 जून 2022 या कालावधीत चाकण एमआयडीसीमधील पॉलिरब कंपनी, महाळुंगे (ता. खेड) येथे घडला. प्रियेश पीटर लोपिस (वय 30, रा. पालघर) यांनी याबाबत शुक्रवारी (दि.1) महाळुंगे पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीनुसार जैन अँड जोशी फर्म या कंपनीचे मालक योगेश राणावत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादींची पॉलिरब ही कंपनी महाळुंगे येथे आहे.

आरोपीने फिर्यादींच्या कंपनीतील लोकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी विमान तिकिटे देतो, असे सांगितले. देशांतर्गत प्रवासासाठी इंडिगो एअरलाईन्स, विस्तारा एअरलाईन्स आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी युरोप व यूके येथे जाण्या-येण्यासाठी एमिरेट्स एअरलाईन्स या कंपनीची तिकिटे देण्याच्या बहाण्याने बनावट व अवैध तिकिटे दिली. त्यातून फिर्यादी आणि त्यांच्या कंपनीची 12 लाख 26 हजार 625 रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादित म्हटले आहे. महाळुंगे पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Back to top button