

गणेश खळदकर, पुणे : पुणे- पिंपरी चिंचवड शहरात अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा भाग दोन भरण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. यंदा अकरावी प्रवेशासाठी 1 लाख 6 हजार 140 जागा उपलब्ध आहेत. तर त्यासाठी 85 हजार 127 विद्यार्थ्यांनी अर्ज केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात सर्वाधिक जागा विज्ञान शाखेला तर जवळपास तेवढ्याच जागा वाणिज्य शाखेसाठी उपलब्ध आहेत. तर सर्वात कमी जागा कला शाखेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. अकरावी प्रवेशासाठी यंदा 345 महाविद्यालयांची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी 313 महाविद्यालयांनी आपली माहिती लॉक केली आहे. त्यातील 301 महाविद्यालयांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली असून 12 महाविद्यालयांची पडताळणी होणे बाकी आहे.
यामध्ये उपलब्ध झालेल्या जागांनुसार विज्ञान शाखेला सर्वाधिक 43 हजार 190 जागा आहेत. त्यानंतर वाणिज्य शाखेला 43 हजार 135 तर कला शाखेला 16 हजार 240 जागा उपलब्ध झाल्या आहेत. एचएसव्हीसी शाखेला 3 हजार 575 जागा अशा एकूण 1 लाख 6 हजार 140 जागा उपलब्ध आहेत. राज्यातील पुणे- पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक या महापालिका क्षेत्रात कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तर, उर्वरित जिल्ह्यांमध्ये ऑफलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया 30 मेपासून सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर सुरू होणार होती.
मात्र भाग एक भरण्यास एक महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी भाग दोन भरण्याचे वेळापत्रक अद्यापही जाहीर करण्यात आलेले नाही. अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत 85 हजार 127 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक भरला आहे. त्यापैकी 59 हजार 4 अर्ज लॉक करण्यात आले आहेत. तसेच 32 हजार 562 अर्ज अॅटो व्हेरिफाईड करण्यात आले आहेत. तर 21 हजार 639 अर्जांची पडताळणी केंद्रावर तपासणी पूर्ण झाली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा तब्बल 21 हजार जागा अधिक असल्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळून अकरावीच्या साधारण तीस हजारांहून अधिक जागा यंदा रिक्त राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
कला शाखेच्या इंग्रजी माध्यमाचा कटऑफ विज्ञान शाखेच्या कटऑफपेक्षाही जास्त असतो. अलीकडे कला शाखेच्या इंग्रजी माध्यमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. मात्र कला शाखेच्या मराठी माध्यमाकडे तुलनेने विद्यार्थी कमी जात आहेत. कारण विज्ञान आणि वाणिज्य शाखेत बारावी केल्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांची संधी असते. तशी संधी कला शाखेत दिसत नाही. त्यामुळे प्रवेशाच्या जागा कमी असल्याचे दिसते. – डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय