कोळगाव : चोरीतील आरोपी मुद्देमालासह जेरबंद | पुढारी

कोळगाव : चोरीतील आरोपी मुद्देमालासह जेरबंद

कोळगाव : पुढारी वृत्तसेवा : बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांमध्ये चोरीचे अनेक प्रकार घडले. त्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना सुरेगाव व सपाटे वस्ती पिंपळगाव येथील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी नुकतेच मुद्देमालासह अटक केली आहे.

बेलवंडी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सुरेगाव, पिंपळगाव पिसा, सपाटे वस्तीवरील चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना, कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान संशयित ऋषीन उर्फ रोशन अशोक काळे (वय 22, रा. रांजणगाव मशिद, ता. पारनेर, हल्ली रा. तळेगाव जि. पुणे) यास ताब्यात घेतले होते. खाक्या दाखवताच त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली.

चोरी केलेल्या सोने, चांदीच्या दागिन्यांपैकी हिश्श्याला आलेल्या सोने, चांदीचे दागिने त्याने काढून दिले. त्याच्याकडून 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मागदर्शनाखाली विजयकुमार बोत्रे, कैलास शिपनकर, राजेंद्र चाटे, अंकुश ढवळे, ज्ञानेश्वर पठारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button