मावळात जोरदार पावसाची प्रतिक्षा | पुढारी

मावळात जोरदार पावसाची प्रतिक्षा

तळेगाव स्टेशन : पुढारी वृत्तसेवा : सध्या मावळात जून महिना संपला तरी पाहिजे असा पाऊस पडला नाही. लोणावळा परिसरात सुरवात झाली आहे परंतु नेहमी प्रमाणे नाही. मावळातील अनेक भागात पावसाने ओढ धरल्याचे चित्र दिसून येत आहे.तुरळक पाऊस जरी पडत असला तरी मावळात नेहमीप्रमाणे बरसणारा पाऊस,काळेकुट्ट ढग सध्या दिसत नाहीत यामुळे अनेक ठिकाणी पेरणीची कामे रखडली आहे.

जेथे पेरणी झाली तेथे दुबार पेरणीचे संकट आहे.भात लावणीचे दहाड सुकायला लागले आहे.पावसा अगोदरची मशागतीची कामे झाली आहेत परंतु पावसाने ओढ दिल्यामुळे नंतर जी कामे असतात ती खोळंबली आहेत.तसेच डोंगरावर,माळरानावर,पठारावर हिरवेगार गवत नेहमीप्रमाणे उगवले नाही,धबधबे वाहत नाहीत,धरणांतील पाणीसाठा संपत अला आहे.

निसर्ग सौंदर्य पाहीजे असे बहरले नाही यामुळे लोणावळा,खंडाळा,कार्ला,पवनानगर,तळेगाव दाभाडे आदी परिसरातील पर्यटन स्थळी पर्यटकांचे आगमन होण्याचे प्रमाण कमी झालेले आहे.गेली दोन वर्ष कोरोना पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळांजवळील व्यवसाय बंद होता आणि आता पावसाने ओढ दिल्यामुळे बोटींग,घोडेस्वारी,हॉटेल,लॉज फळफळावर खाद्य पदार्थ आदी छोटे मोठ्या व्यावसायात मंदी आलेली आहे यामुळे व्यावसायिकां समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मावळ भाग इंद्रायणी भात पीकाचे आगार आहे परंतु पावसाने ओढ दिल्यामुळे भात उत्पन्नावर परीणाम होण्याची शक्यता आहे.ज्यांचे शेताजवळ तळे,नदी आहे तेथून ईलेक्ट्रिक पंपाचे आणि पाईप लाईनचे सहाय्याने पाणी आणुन भात लावणी केली जात आहे परंतु डोंगर माथ्यावरुन,माळावरुन वाहत येणाऱ्या पाण्यावर अवलंबून असणारी डोंगराच्या पायथ्याशी असणारी शेतीची पाण्याअभावी लागवड आणि पेरणी होणेस अडचणी होत आहेत.यामुळे तेथील बळीराजा चिंतेत आहे.

पावसाने ओढ धरल्यामुळे जनावरांच्या चा-याचा प्रश्न बिकट बनला आहे.यांत्रिकी करणामुळे जनावरांच्या संख्येत जरी घट झाली असलीतरी बैलगाडा शर्यतीसाठी खिलार बैल पाळणारे अनेक जण आहेत दुग्ध व्यावसायासाठी गायी,म्हसी,शेळ्या पाळणारांचे प्रमाण मोठे आहे.पावसाने आणखी ओढ दिलीतर चा-याचा प्रश्न निर्माण होईल आणि त्याचा दुग्ध व्यावसायावर परीणाम होणेची शक्यता आहे.बारामती,सासवड,भागातून येणा-या आणि स्थानिक मेंढपाळांसमोर मेंढ्यांना चा-याचा प्रश्न भेडसावत आहे.

Back to top button